जडीबुटी विकणाऱ्या दोन साधूंना मुलं पळवणारे समजून जमावाने मारले; पोलिसांनी वेळेवर हस्तक्षेप करून टाळली मोठी दुर्घटना

जडीबुटी विकणाऱ्या दोन साधूंना मुलं पळवणारे समजून जमावाने मारले; पोलिसांनी वेळेवर हस्तक्षेप करून टाळली मोठी दुर्घटना
रावेर (प्रतिनिधी) – तालुक्यातील मुंजलवाडी, कुसुंबा आणि लोहारा या तीन गावांमध्ये रविवारी जडीबुटी विकणाऱ्या दोन साधूंना मुले पळवणारे असल्याच्या संशयातून बेदम मारहाण करण्यात आली. चुकीच्या समजुतीतून झालेल्या या घटनेमुळे परिसरात तणावाचे वातावरण निर्माण झाले असून, सुदैवाने सावदा पोलिसांनी वेळीच हस्तक्षेप करत मोठा अनर्थ टाळला.
हरियाणाच्या सिरसा येथील रहिवासी जस्सानाथ पुनुनाथ (वय ६०) आणि मोनूनाथ जस्सानाथ (वय २०) हे दोघे रविवारी सकाळी मुंजलवाडी येथे आले होते. ते जडीबुटी विक्रीसाठी महाराष्ट्रात आले असून, गावात एका व्यक्तीच्या नसदुखीच्या तक्रारीवर त्यांनी उपचार केले. यानंतर संबंधित व्यक्तीने इतर काही लोकांना बोलावून या साधूंवर मुलं पळवणाऱ्या टोळीचा संशय घेतला आणि अचानक मारहाण सुरू केली.
हल्ल्याच्या भीतीने साधूंनी आपल्या HR13E-6516 क्रमांकाच्या चारचाकी वाहनातून पळ काढला. मात्र त्यांचा पाठलाग करत कुसुंबा येथे पुन्हा त्यांना अडवून मारहाण करण्यात आली. तेथूनही ते पळाले असता एका व्यक्तीला त्यांचा कट लागल्याचा प्रकार घडला. यानंतर लोहारा येथे तिसऱ्यांदा लोकांनी त्यांना गाठले आणि पुन्हा एकदा मारहाण करत गाडीची तोडफोड केली.
या घटनेची माहिती मिळताच सावदा पोलीस ठाण्याचे अधिकारी व कर्मचारी तत्काळ घटनास्थळी पोहोचले आणि जमावाला पांगवत दोन्ही साधूंना सुरक्षिततेत बाहेर काढले. त्यामुळे पालघरच्या घटनेसारखी जीवघेणी पुनरावृत्ती टळली.
दरम्यान, या प्रकरणी सावदा पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदविण्याची प्रक्रिया सुरू आहे. या घटनेत जखमी झालेल्या इकबाल मोहम्मद तडवी यांनी गाडीच्या धडकेबाबत तक्रार दाखल केली आहे. तसेच साधूंनी स्वतःवर झालेल्या मारहाणीबाबत स्वतंत्र तक्रार देत दोषींवर कारवाईची मागणी केली आहे.
पोलीस अधिक तपास करत असून अफवांवर विश्वास न ठेवण्याचे आवाहन प्रशासनाकडून करण्यात आले आहे.