“देणगी नव्हे, गरजूंच्या जीवनातील आनंद महत्त्वाचा” – कल्याण बॅनर्जी

“देणगी नव्हे, गरजूंच्या जीवनातील आनंद महत्त्वाचा” – कल्याण बॅनर्जी
गांधीतीर्थ येथे रोटरी क्लब जळगावचा ७६ वा पदग्रहण सोहळा उत्साहात संपन्न
जळगाव – “सामाजिक कार्यासाठी किती निधी दिला हे महत्त्वाचे नाही, तर त्या माध्यमातून गरजूंच्या जीवनात किती आनंद आणि बदल निर्माण झाला हे अधिक महत्त्वाचे आहे,” असे स्पष्ट मत रोटरी इंटरनॅशनलचे माजी अध्यक्ष कल्याण बॅनर्जी यांनी व्यक्त केले.
रोटरी क्लब जळगावच्या ७६ व्या पदग्रहण सोहळ्याचे आयोजन जैन हिल्सवरील गांधीतीर्थ येथील कस्तुरबा सभागृहात करण्यात आले होते. बॅनर्जी प्रमुख अतिथी म्हणून उपस्थित होते. कार्यक्रमात रोटरी डिस्ट्रिक्ट ३०३० चे प्रांतपाल ज्ञानेश्वर शेवाळे, जैन इरिगेशनचे चेअरमन अशोक जैन, तसेच सहप्रांतपाल डॉ. अपर्णा भट-कासार यांचीही विशेष उपस्थिती होती.
आपल्या भाषणात बॅनर्जी यांनी कलकत्त्यात रोटरीचा देशातील पहिला क्लब स्थापन झाल्याचा इतिहास सांगत, “आज रोटरी ही जगातील सर्वात वेगाने वाढणारी स्वयंसेवी संस्था असून केवळ संख्यात्मक नव्हे तर गुणवत्तेवर भर दिला पाहिजे,” असे मत मांडले. मराठी भाषेप्रती आपुलकी व्यक्त करत त्यांनी भाषणाची सुरुवात मराठीतून केली, यामुळे उपस्थितांचे विशेष लक्ष वेधले.
प्रांतपाल ज्ञानेश्वर शेवाळे यांनी नवीन रोटरी वर्ष हे परिवर्तनाचे वर्ष असेल, असे सांगत सेवाकार्याच्या दिशेने प्रेरणा दिली. अशोक जैन यांनी नवनिर्वाचित अध्यक्ष गिरीश कुलकर्णी यांच्या कार्यकर्तृत्वाचे कौतुक करत, रोटरॅक्टमधील आपल्या आठवणींना उजाळा दिला आणि क्लबकडून दिलेल्या मानद सदस्यत्वाबद्दल आभार मानले.
कार्यक्रमात मावळते अध्यक्ष ॲड. सागर चित्रे यांनी अध्यक्षपदाची सूत्रे गिरीश कुलकर्णी यांच्याकडे सुपूर्द केली. तर सचिवपदाची सूत्रे पराग अग्रवाल यांनी सुभाष अमळनेरकर आणि पंकज व्यवहारे यांच्याकडे दिली. सूत्रसंचालन आणि अहवाल सादरीकरणही चित्रे यांनी केले. अध्यक्ष गिरीश कुलकर्णी यांनी आपल्या मनोगतात भावनिक उल्लेख करत नवीन कार्यकारिणीची घोषणा केली. त्यांच्या मातोश्री सुनंदा कुलकर्णी यांनीही यावेळी आपली भावना व्यक्त केली.
कार्यक्रमाची सुरुवात मृण्मयी कुलकर्णी हिच्या कथक नृत्यातून सादर झालेल्या गणेशवंदनेने झाली. यावेळी ‘अजिंठा’ या क्लब बुलेटिनच्या विशेषांकाचे प्रकाशन कॅप्टन मोहन कुलकर्णी यांच्या संपादनात करण्यात आले.
डॉ. प्रदीप जोशी आणि डॉ. अपर्णा भट-कासार यांनी प्रमुख अतिथींचा परिचय करून दिला. आभार प्रदर्शन ॲड. हेमंत भंगाळे यांनी केले.
कार्यक्रमात विविध देणग्याही जाहीर करण्यात आल्या. जितेंद्र ढाके यांनी रोटरी फाउंडेशनसाठी तीन लाख रुपये, कवरलाल संघवी यांनी मोतीबिंदू शस्त्रक्रियांसाठी एक लाख रुपये, तर विजय जोशी यांनी २५ हजार रुपयांचा निधी सुपूर्द केला.
कार्यक्रमास माजी प्रांतपाल डॉ. चंद्रशेखर सिकची, राजीव शर्मा, राजेंद्र भामरे, डॉ. आरती व डॉ. संजीव हुजूरबाजार, तसेच इनरव्हीलच्या माजी डिस्ट्रिक्ट चेअरमन संगीता घोडगावकर यांच्यासह विविध मान्यवर उपस्थित होते.