ब्रेकिंग : जळगाव शहरातील अवजड वाहतुकीसाठी नियमावली, वाचा वेळ आणि मार्ग
महा पोलीस न्यूज । चेतन वाणी । जळगाव शहरातील छत्रपती शिवाजी नगर उड्डाणपुलावर अपघात झाल्यानंतर पोलीस अधिक्षकांकडून अवजड वाहतुकीसाठी नियमावली जारी करण्यात आली आहे. आकाशवाणी चौक ते टॉवर चौकादरम्यान अवजड वाहतुकीसाठी वेळ निश्चित करण्यात आली असून काही हरकती असल्यास मागवल्या आहेत.
जळगाव शहरात वाहनांच्या रहदारीमध्ये मोठ्या प्रमाणात वाढ होत असून दिवसेंदिवस नवीन वाहनांची प्रादेशिक परिवहन विभाग, जळगाव यांच्याकडे मोठ्या प्रमाणात नोंदणी होत आहे. जळगाव शहराचा विचार करता आकाशवाणी चौक ते रेल्वे स्टेशन पावेतोचा मार्ग जास्त रहदारीचा असून या मार्गावर जिल्हाधिकारी कार्यालय, पोलीस अधीक्षक कार्यालय, शाळा, महाविद्यालय, रेल्वे स्टेशन, बस स्थानक, मुख्य बाजारपेठ, सरकारी व खाजगी दवाखाने, बँका व मोठ्या प्रमाणात नागरी वस्ती आहे.
जळगाव शहरातील रेल्वे स्टेशन व बस स्टॅन्ड करिता नागरिकांना जाण्यासाठी नेहरू चौक ते रेल्वे स्टेशन हाच मुख्य मार्ग उपलब्ध असून जळगाव रेल्वे स्थानकावर येणाऱ्या व जाणाऱ्या नागरिकांची मोठ्या प्रमाणात वर्दळ असते. सर्वसामान्य नागरिकांच्या तक्रारी, शालेय व महाविद्यालयीन विद्यार्थी, नागरिक व वाहनधारक यांची सुरक्षितता व जळगाव शहरातील वाहतूक कोंडीचा प्रश्न या सर्व बाबींचा सांगोपांग विचार पोलीस प्रशासनाने त्याठिकाणी वाहतुकीचे मार्गात बदल करण्याचे आदेश दिले आहेत.
असे आहेत बदल आणि वेळ
आकाशवाणी चौक ते रेल्वे स्टेशन पावेतो जाणारे सर्व रस्ते व रेल्वे स्टेशन-टॉवर चौक – नेरी-नाका चौक, अजिंठा चौक तसेच नेरी-नाका ते स्वातंत्र्य चौक पावेतो जाणारे रस्त्यांवर, जाण्यास व येण्यास, सर्व प्रकारच्या खाजगी / लक्झरी बसेस व अवजड वाहनांना (राज्य परिवहन मंडळ बसेस वगळून) सदर मार्गावर प्रवेश बंदी करण्यात येत आहे.
अवजड वाहने (मालवाहतूक करणारी) शहरात अजिंठा चौक-नेरी नाका-टॉवर चौक-शिवाजीनगर उड्डाणपूल या मार्गाने सकाळी ९ ते दुपारी ३ वाजेपर्यंत आणि रात्री ९ ते सकाळी ६ वाजेपर्यंत या कालावधीतच मालवाहतूक करता येणार आहे. ही अधिसूचना शासकीय राजपत्रात प्रसिद्ध झाल्यापासून एक महिन्यापर्यंत उक्त मसुद्यासंबंधी कोणत्याही व्यक्ती/ संस्थेकडून ज्या कोणत्याही हरकती किंवा सूचना असतील त्यांनी त्या सूचना मुदत संपण्यापूर्वी सादर केल्यास त्यावर पोलीस अधीक्षक, जळगाव विचार करतील.