Politics

पक्षांतर : संजय पवारांनी घेतला एकनाथराव खडसेंचा खरपूस समाचार, म्हणाले..

महा पोलीस न्यूज | ७ एप्रिल २०२४ | राष्ट्रवादी काँग्रेसचे आ.एकनाथराव खडसे ४० महिन्यांनी पुन्हा भाजपामध्ये घरवापसी करणार आहेत. जिल्हा बँकेचे अध्यक्ष आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष संजय पवार यांनी एकनाथराव खडसेंचा खरपूस समाचार घेतला आहे. खडसेंनी शरद पवार साहेबांना धोका दिला असून त्यांच्याशी गद्दारी केली आहे. पवार साहेबांच्या जवळच्या लोकांना दूर करीत त्यांनी त्यांचे पंख छाटण्याचा प्रयत्न केला. आम्ही आमच्या भिंतीवरील फोटो कधीच काढले नाही. पवार साहेबांना धोका देणारी अवलाद जन्माला आलीय, अशा शब्दात त्यांनी एकनाथराव खडसेंच्या पक्षांतराचा खरपूस समाचार घेतला आहे.

भारतीय जनता पक्षात ४० वर्ष राहिलेले ज्येष्ठ नेते आ.एकनाथराव खडसे आपल्या राज्यातील नेतृत्वावर टीका करीत भाजपातून बाहेर पडले. ऑक्टोबर २०२० मध्ये शरद पवारांच्या नेतृत्वात एकनाथराव खडसेंनी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केला. राष्ट्रवादी काँग्रेसच्या ४० महिन्याच्या कार्यकाळात पक्षाने एकनाथराव खडसे आणि रोहिणी खडसे यांना बरेच काही दिले. राष्ट्रवादी काँग्रेसकडून एकनाथराव खडसे विधान परिषदेत आमदार म्हणून देखील निवडून आले. ऐन लोकसभा निवडणुकीच्या काळात खडसेंनी राष्ट्रवादीला सोडचिठ्ठी देत पुन्हा भाजपची वाट धरत असल्याचे सांगितले आहे.

एकनाथराव खडसेंच्या घरवापसीमुळे भाजप आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे दोन्ही गट ढवळून निघणार असून संमिश्र प्रतिक्रिया उमटू लागल्या आहेत. एकीकडे भाजपमध्ये खडसेंची घरवापसी म्हणजे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि मंत्री गिरीश महाजन यांना शह मानला जात आहे. दुसरीकडे खडसेंनी राष्ट्रवादी सोडणे म्हणजे शरद पवार साहेबांशी गद्दारी म्हटले जात आहे. दोन्ही गटाकडून वेगवेगळ्या प्रतिक्रिया उमटत आहेत. अनेक ग्रुपमध्ये यावर चर्चा सुरू झाली आहे.

जिल्हा बँकेचे अध्यक्ष आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष संजय पवार यांनी काही दिवसापूर्वी देखील एकनाथराव खडसेंचा चांगलाच समाचार घेत जहरी टीका केली होती. आता खडसेंनी भाजप प्रवेशाबाबत वक्तव्य केल्याने पुन्हा संजय पवारांनी त्यांचा समाचार घेतला आहे. संजय पवार यांनी एका व्हॉट्सॲप ग्रुपवर संदेश पोस्ट करीत आपल्या भावना मांडल्या आहेत. खडसे यांनी आ.मंगेश चव्हाण, ना.गिरीश महाजन यांच्यासोबत शरणागती पत्कारली आणि नंतर पक्षप्रवेशाची तारीख निश्चित झाली असे त्यांनी म्हटले आहे.

इतकंच नव्हे तर एकनाथराव खडसेंचा एक जुना व्हिडिओ व्हायरल करीत पूजनीय शरदचंद्र पवार साहेबांना धोका देणारी एक अवलाद जन्माला आली असून तिचा नायनाट करा असेही त्यांनी म्हटले आहे. संजय पवार यांच्याशी याबाबत चर्चा केली असता आम्ही आमच्या भिंतीवरचे फोटो कधीच खाली उतरवले नाही. खडसेंनी शरद पवार साहेबांशी जुळून असलेल्या घराण्यांना दूर करण्याचे काम करीत त्यांचे हात तोडले. रोहिणी खडसे या शरद पवार साहेबांच्या सोबत असल्याचे सांगत असल्या तरी त्यांनी संत मुक्ताईच्या मंदिरात शपथ घ्यावी, असे संजय पवार यांनी म्हटले आहे.

Chetan Wani

पत्रकारिता क्षेत्रात गत १५ वर्षांपासून कार्यरत. क्राईम रिपोर्टींगचा १२ वर्षांचा प्रदीर्घ अनुभव. राजकारण, महापालिका, उद्योग जगतातील विशेष लेखन. मंत्रालय, माहिती व जनसंपर्क विभागातील पत्रकारितेचा अनुभव. लोकसभा, विधानसभा, मनपा निवडणूक काळात मीडिया मॅनेजमेंट. मोबाईल नंबर : 9823333119

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button