Big Breaking : जळगाव जिल्ह्यातील दोन वाळूमाफियांवर ‘एमपीडीए’

महा पोलीस न्यूज | १७ एप्रिल २०२४ | जळगाव जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक डॉ.महेश्वर रेड्डी यांनी देखील एमपीडीए आणि प्रतिबंधात्मक कारवायांचा सपाटा सुरूच ठेवला आहे. दोन महिन्यात ८ पेक्षा अधिक एमपीडीए कारवाई आणि ५ हजार पेक्षा जास्त प्रतिबंधात्मक कारवाई करण्यात आल्या आहेत. जिल्हा पोलीस प्रशासनाकडून गुरुवारी दोन वाळूमाफियांना एमपीडीए अंतर्गत स्थानबद्ध करण्यात आले. पोलीस अधीक्षक डॉ.रेड्डी यांनी देखील वृत्ताला दुजोरा दिला आहे.
जळगाव जिल्ह्यात गेल्या दीड वर्षापासून प्रतिबंधात्मक कारवाई, एमपीडीए आणि मकोका अंतर्गत जोरदार कारवाई केली जात आहे. पोलीस अधीक्षक एम.राजकुमार यांनी सुरू ठेवलेला कारवाईचा दणका पोलीस अधीक्षक डॉ.महेश्वर रेड्डी यांनी देखील कायम ठेवला आहे. सध्या सुरू असलेल्या कारवाई लक्षात घेता गत काळात झालेला ‘अब तक ५६’ चा आकडा यंदा तुटणार अशी शक्यता आहे. गेल्या दोन महिन्यात जिल्हा पोलीस प्रशासनाने लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मोठ्या कारवाया केल्या आहेत.
जिल्हा पोलीस प्रशासनाकडून पाठविण्यात आलेल्या २ वाळूमाफियांवरील एमपीडीए प्रस्तावाला जिल्हाधिकारी यांनी मंजुरी दिली असून दोघांची कारागृहात रवानगी करण्यात आल्याची माहिती आहे. दोघांची नावे अद्याप समोर आली नसली तरी पोलीस अधीक्षक डॉ.महेश्वर रेड्डी यांनी या वृत्ताला दुजोरा दिला आहे. स्थानिक पोलीस ठाणे आणि जळगाव स्थानिक गुन्हे शाखेच्या माध्यमातून ही कारवाई पार पाडण्यात आली आहे. पोलीस प्रशासनाकडून शुक्रवारी याबाबत अधिकृत माहिती दिली जाण्याची शक्यता आहे.