शिरपुर तालुका पोलिसांची दमदार कामगिरी : विदेशी दारूसह २० लाखांचा मुद्देमाल पकडला
महा पोलीस न्यूज । चेतन वाणी । शिरपूर तालुका पोलिसांनी दमदार कामगिरी केली आहे. गोपनीय माहितीच्या आधारे पोलीस निरीक्षक जयपाल हिरे यांच्या पथकाने विदेशी दारूसह २० लाखांचा मुद्देमाल हस्तगत केला आहे. पोलिसांनी दि.१५ रोजी सिमा तपासणी नाका, हाडाखेड येथे सापळा रचून पहाटे ही कारवाई केली.
मिळालेल्या माहितीनुसार, दि.१४ रोजी रात्री १० वाजेच्या सुमारास पोलीस निरीक्षक जयपाल हिरे यांना गोपनीय बातमीदारा मार्फत बातमी मिळाली की, सेंधवा मध्यप्रदेश राज्याकडून धुळेकडे एक कंटेनर क्र.एचआर.५५.एए.५०३६ हा येत असुन त्यामध्ये अवैध दारुची चोरटी वाहतुक होत आहे. या बातमी वरुन पोलीस निरीक्षक जयपाल हिरे यांनी हाडाखेड चेक पोस्टजवळ मुंबई आग्रा रस्त्यावर नाकाबंदी लावुन कारवाई करणे बाबत आदेशित केले होते.
पहाटे पकडला कंटनेर, चालकाने काढला पळ
पथक सिमा तपासणी नाका, हाडाखेड येथे नाकाबंदी करुन वाहनाची तपासणी करीत असतांना दि.१५ रोजी रात्री २.३० वाजेचे सुमारास वाहन येथे आले तेव्हा चालकाला थांबण्याचा ईशारा केला असता त्यावरील चालकाने वाहन न थांबवता थोड्या अंतरावर जावुन वाहन थांबविले व वाहनातुन उडी घेत पळुन काढला. पथकाने वाहन पोलीस ठाणे आवारात आणले. वाहनाबाबत पोलीस ठाणेत कोणीही इसम चौकशी करिता न आल्याने तसेच वाहनाचे कॅबिनमध्ये वाहनाची व वाहनातील मालाची कोणतीही कागदपत्रे दिसून न आल्याने पोलीस निरिक्षक जयपाल हिरे यांनी वाहनाची झडती घेण्याच्या सूचना केल्या.
महागडी दारू, बिअरचे बॉक्स पकडले
तपासणी करताना पोलिसांना वाहनात ट्युबर्ग बिअर, ऑल सिझन रिझर्व व्हिस्की, रॉयल जनरल व्हिस्की, रॉयल चॅलेंज फाईन रिझर्व व्हिस्की अशा विदेशी दारुचे बॉक्स मिळुन आले. पोलिसांनी कारवाईमध्ये १५ लाखाचे वाहन व त्यामध्ये ५ लाख २६ हजार ४५२ रुपयाची विदेशी दारु असा एकुण २० लाख २६ हजार ४५२ रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे. त्याबाबत शिरपुर तालुका पोलीस ठाणे गुन्हा रजि. नं. ३१९/२०२४ महाराष्ट्र दारुबंदी कायदा कलम ६५(अ) (ई) ८०,८३ प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पथकात यांचा होता समावेश
संपूर्ण कारवाई धुळे पोलीस अधीक्षक श्रीकांत धिवरे, अपर पोलीस अधीक्षक किशोर काळे, उपविभागीय पोलीस अधिकारी शिरपुर विभाग सुनिल गोसावी यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक जयपाल हिरे, हवालदार संतोष पाटील, कर्मचारी स्वप्निल बांगर, संजय भोई, योगेश मोरे, धनराज गोपाल, सुनिल पवार अशांनी कारवाई केली आहे. गुन्ह्याचा तपास पोलीस उपनिरीक्षक मिलिंद पवार करीत आहेत.