लिफ्ट देण्याच्या बहाण्याने चोरी करणाऱ्यांना १२ तासांत अटक

एमआयडीसी पोलिसांची कामगिरी; २५ हजार रुपये रोख रकमेसह वाहन जप्त
जळगाव : एका ७० वर्षीय वृद्धाला लिफ्ट देण्याच्या बहाण्याने त्यांच्याकडील २५ हजार रुपये चोरणाऱ्या दोन आरोपींना एमआयडीसी पोलिसांनी अवघ्या १२ तासांत जेरबंद केले आहे. पोलिसांनी आरोपींकडून चोरीची संपूर्ण रक्कम आणि गुन्ह्यात वापरलेली चारचाकी गाडीही जप्त केली आहे.
१ ऑगस्ट २०२५ रोजी दुपारी ३.३० वाजण्याच्या सुमारास, एक वृद्ध व्यक्ती कालिका माता मंदिराजवळून पायी जात असताना, एका चारचाकी वाहनातून आलेल्या दोन अनोळखी व्यक्तींनी त्यांना ‘पुढील चौकात सोडून देतो’ असे सांगून गाडीत बसवले. गाडीत मागची सीट खराब असल्याचे कारण देत त्यांना पुढील सीटवर बसण्यास भाग पाडले. काही अंतर पुढे गेल्यावर त्यांना गाडीतून खाली उतरवून दिले. खाली उतरल्यानंतर त्या वृद्धाच्या खिशातून २५,००० रुपये चोरीला गेल्याचे त्यांच्या लक्षात आले. त्यांनी तात्काळ एमआयडीसी पोलीस ठाण्यात जाऊन तक्रार दिली.
पोलीस निरीक्षक बबन आव्हाड यांनी तातडीने गुन्हे शोध पथकातील पोलीस उपनिरीक्षक राहुल तायडे, चंद्रकांत धनके, सहायक फौजदार विजयसिंग पाटील, पोलीस हेड कॉन्स्टेबल गणेश शिरसाळे, प्रमोद लाडवंजारी आणि किरण चौधरी यांना घटनास्थळी पाठवले. सीसीटीव्ही फुटेज आणि गोपनीय माहितीच्या आधारे आरोपींचा शोध घेण्याचे निर्देश दिले. या प्रकरणी एमआयडीसी पोलीस ठाण्यात भारतीय न्याय संहिता २०२३ नुसार गुन्हा दाखल करण्यात आला होता.
गुन्हे शोध पथकाने नेत्रम विभागाचे पोलीस कॉन्स्टेबल मुबारक देशमुख यांच्या मदतीने सीसीटीव्ही फुटेज तपासले आणि आरोपींची माहिती मिळवली. पोलिसांनी तात्काळ सापळा रचून गेंदालाल मिल परिसरातून संशयित आरोपी अर्शद शेख रज्जाक शेख (वय ३२, रा. गेंदालाल मिल, जळगाव) आणि अताउर रेहमान मोहम्मद शकील (वय ३५, रा. गेंदालाल मिल, जळगाव) यांना ताब्यात घेतले.
सखोल चौकशीत दोघांनीही गुन्ह्याची कबुली दिली. पोलिसांनी त्यांच्याकडून चोरीला गेलेली २५,००० रुपयांची रोख रक्कम आणि गुन्ह्यात वापरलेले सुमारे २ लाख रुपये किमतीचे ‘स्विफ्ट डिझायर’ वाहन जप्त केले. आरोपींना अटक करून न्यायालयात हजर केले असता, न्यायालयाने त्यांना तीन दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे. या गुन्ह्याचा पुढील तपास पोलीस हेड कॉन्स्टेबल संजीव मोरे करत आहेत.
ही यशस्वी कारवाई पोलीस अधीक्षक महेश्वर रेड्डी, अपर पोलीस अधीक्षक अशोक नखाते आणि पोलीस उपअधीक्षक संदीप गावीत यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली.






