
महा पोलीस न्यूज । चेतन वाणी । जळगाव शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात दाखल असलेल्या कावीळ आणि न्यूमोनियाने त्रस्त असलेल्या दोन वर्षांच्या बालिकेला अत्यावश्यक रक्ताची गरज भासल्याने, कुटुंबीयांची मोठी धावपळ सुरू होती. अनेक ठिकाणी रक्त उपलब्ध न झाल्याने परिस्थिती गंभीर होत असताना, गावाचे सरपंच प्रल्हाद चव्हाण यांच्या पुढाकारातून आरोग्यदूत पै.शिवाजी पाटील यांनी स्वतः रक्तदान करून बालिकेच्या उपचाराला जीवनदायी आधार दिला.
रक्तासाठी सुरू झाली शोधमोहीम
खुशी भानुदास चव्हाण ही दोन वर्षांची बालिका गंभीर अवस्थेत दाखल होती. तातडीच्या रक्तपुरवठ्याविना उपचार थांबण्याची वेळ आली होती. नातेवाईकांनी रक्त शोधण्यासाठी अनेक रुग्णालये आणि रक्तपेढ्यांशी संपर्क साधला, परंतु सर्वत्र ‘उपलब्ध नाही’ असा प्रतिसाद मिळत होता. अखेर मदतीची शेवटची आशा म्हणून त्यांनी गावचे सरपंच प्रल्हाद चव्हाण यांच्याशी संपर्क साधला.
आरोग्यदूतांची तत्पर धावपळ
प्रकरणाची गंभीरता लक्षात घेत सरपंचांनी त्वरित सामाजिक सेवेत आघाडीवर असणारे आणि मंत्री गिरीश महाजन यांच्या आरोग्य उपक्रमांशी संलग्न पै.शिवाजी पाटील यांना परिस्थितीची माहिती दिली. रक्ताची सोय व्हावी म्हणून पाटील यांनीही अनेक ठिकाणी संपर्क साधला, मात्र सर्व प्रयत्न निष्फळ ठरले. शेवटी रेड क्रॉसने “डोनर मिळाल्यास रक्त देता येईल” असे स्पष्ट केले.
५६ व्या रक्तदानातून दिला नवजीवनाचा श्वास
क्षणाचाही विलंब न करता, शिवाजी पाटील यांनी स्वतःच डोनर म्हणून पुढे येत रक्तदान केले. त्यांच्या या कृतीमुळे रक्त पुरवठा तत्काळ उपलब्ध झाला आणि बालिकेच्या उपचारांना आवश्यक वेग मिळाला. उल्लेखनीय बाब म्हणजे, पाटील यांचे हे एकूण ५६ वे रक्तदान असून, त्यांनी यापूर्वीही अनेक रुग्णांना वेळेवर मदत केली आहे.
कुटुंबीयांकडून कृतज्ञतेची भावना
वेळीच मिळालेल्या रक्तामुळे उपचारातील अडथळा दूर झाल्याने रुग्णाच्या कुटुंबीयांनी शिवाजी पाटील यांचे आभार मानले. तसेच या मदतीसाठी मार्गदर्शन करणारे सरपंच प्रल्हाद चव्हाण आणि प्रेरणादायी सामाजिक उपक्रमांना प्रोत्साहन देणारे मंत्री गिरीश महाजन यांच्याही कार्याचे कौतुक करण्यात आले. या घटनेतून, सामाजिक जाणीवेने प्रेरित होऊन घेतलेला एक निर्णय किती जीव वाचवू शकतो याचा पुन्हा एकदा प्रत्यय आला आहे






