मुक्ताईनगरच्या सामाजिक कार्यकर्त्याचा अपघाती मृत्यू, घातपाताचा संशय
महा पोलीस न्यूज | ४ मार्च २०२४ | मुक्ताईनगर शहरातील सीड फार्म येथील रहिवासी शेख अजगर शेख अकबर वय-४७ वर्षे यांचा दि.२ रोजी अपघाती मृत्यू झाला असून या घटनेने तालुक्यात खळबळ उडाली आहे. या संदर्भात मुक्ताईनगर पोलिसात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. दरम्यान, हा अपघात आहे घातपात? अशी चर्चा परिसरात सुरू आहे.
मुक्ताईनगर येथील शेख झाकीर शेख जाबीर यांनी पोलिसात दिलेल्या फिर्यादीवरून शेख अजगर शेख अकबर यांचा मुक्ताईनगर तालुक्यातील डोलारखेडा फाटा ते डोलारखेडा गाव या दरम्यान अपघात झाल्याने त्यांचा मृत्यू झाला असल्याची अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. दरम्यान, शेख अजगर शेख अकबर हे तळमळीचे सामाजिक कार्यकर्ते होते. ते अतिशय अभ्यासू आणि स्पष्ट वक्ते म्हणून त्यांची परिसरात ओळख होती तसेच ते मुक्ताईनगर येथील बाल विकास प्रकल्प अधिकारी कार्यालयात कंत्राटी पद्धतीवर कर्मचारी म्हणून कार्यरत होते. त्यांनी काही काळ पत्रकारिता क्षेत्रातही काम केले होते.
शेख अजगर शेख अकबर यांच्या मृत्यूच्या बातमीने परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे. त्यांच्या पश्चात आई-वडील, पत्नी, मुलगा, मुलगी, बहिणी, जावई असा परिवार आहे. प्राथमिक तपासानुसार त्यांचा मृत्यू अपघातानेच झाला असल्याचे समोर आले आहे. परंतु सदर घटना अपघात नसून घातपाताचा प्रकार असल्याचा संशय मात्र व्यक्त केला जात आहे. मृताच्या शवविच्छेदन अहवालातून तसेच मोबाईल सीडीआर आणि इतर तांत्रिक बाबींची तपासणीअंती मृत्युचे खरे कारण समोर येणार आहे. पोलीस निरीक्षक नागेश मोहीते यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक राहुल बोरकर पुढील तपास करीत आहे.