राष्ट्रीय क्रीडा दिनी अमळनेरच्या नूतन भोईचा गौरव


राष्ट्रीय क्रीडा दिनी अमळनेरच्या नूतन भोईचा गौरव
राष्ट्रीय स्पर्धांतील दमदार कामगिरीने अमळनेरच्या शिरपेचात मानाचा तुरा; ऑलिम्पिक पदकाचे स्वप्न
अमळनेर | पंकज शेटे : राष्ट्रीय क्रीडा दिनाचे औचित्य साधून अमळनेर शहराचे नाव क्रीडा क्षेत्रात उज्ज्वल करणाऱ्या भोईवाडा येथील गुणी राष्ट्रीय खेळाडू नूतन किशोर भोई हिच्या उल्लेखनीय क्रीडा कामगिरीचा विशेष गौरव करण्यात येत आहे. अत्यंत प्रतिकूल परिस्थितीतही मेहनत, जिद्द आणि सातत्याच्या जोरावर नूतनने विविध राष्ट्रीय व विभागीय स्पर्धांमध्ये आपली छाप उमटवली असून, तिच्या यशामुळे अमळनेरच्या क्रीडा क्षेत्राच्या लौकिकात भर पडली आहे.
नूतन भोई हिने एकाच क्रीडा प्रकारापुरते मर्यादित न राहता इनलाइन रोलर स्केटिंग, आईस हॉकी आणि रायफल शूटिंग अशा विविध खेळांमध्ये आपल्या कौशल्याची चमक दाखवली आहे.
राष्ट्रीय-आंतरराष्ट्रीय स्तराकडे नूतनची वाटचाल
१० मीटर एअर पिस्तूल : नाशिक विभागीय स्तरावरील १० मीटर एअर पिस्तूल स्पर्धेत नूतनने अचूक नेमबाजी आणि एकाग्रतेचे उत्कृष्ट प्रदर्शन केले.
६३ वी नॅशनल इनलाइन रोलर स्केटिंग चॅम्पियनशिप २०२५ : विशाखापट्टणम येथे झालेल्या राष्ट्रीय रोलर स्केटिंग स्पर्धेत नूतनने प्रतिनिधित्व करत आपल्या वेग आणि कौशल्याची छाप पाडली.
IHAI नॅशनल आईस हॉकी चॅम्पियनशिप २०२६ : उत्तराखंडमधील डेहराडून येथे झालेल्या आव्हानात्मक राष्ट्रीय आईस हॉकी स्पर्धेतही नूतनने सहभाग नोंदवत उत्कृष्ट खेळाचे प्रदर्शन केले.
विविध क्रीडा प्रकारांमध्ये राष्ट्रीय स्तरावर प्रतिनिधित्व करण्याची संधी मिळाल्याने नूतनच्या क्रीडा प्रवासाला नवी दिशा मिळाली आहे. भविष्यात आंतरराष्ट्रीय स्तरावर भारताचे प्रतिनिधित्व करून देशासाठी पदक जिंकण्याचे तिचे स्वप्न आहे.
ग्रामीण खेळाडूंना सुविधांची गरज
आपल्या क्रीडा प्रवासाबद्दल बोलताना नूतन भोई म्हणाली, “ग्रामीण भागातील खेळाडूंमध्ये गुणवत्ता आणि जिद्द मोठ्या प्रमाणात आहे. मात्र आर्थिक अडचणींमुळे अनेक खेळाडूंची स्वप्ने अपुरी राहतात. मी इनलाइन स्केटिंग, आईस हॉकी आणि रायफल शूटिंगमध्ये राष्ट्रीय स्तरावर प्रतिनिधित्व केले आहे. आता आंतरराष्ट्रीय स्तरावर भारतासाठी पदक जिंकण्याचे माझे ध्येय आहे.”
“क्रीडा साहित्य, प्रशिक्षण आणि प्रवासाचा खर्च मोठा असतो. शासनाने ग्रामीण खेळाडूंसाठी नियमित शिष्यवृत्ती, आर्थिक मदत, दर्जेदार क्रीडा साहित्य आणि तज्ज्ञ प्रशिक्षक उपलब्ध करून द्यावेत. अमळनेरसारख्या ग्रामीण भागात आधुनिक क्रीडा संकुले उभारल्यास आमच्यासारख्या खेळाडूंना ऑलिम्पिकपर्यंत पोहोचण्याची संधी मिळेल आणि देशाचा तिरंगा उंचावता येईल,” अशी अपेक्षाही तिने व्यक्त केली.
अमळनेरच्या क्रीडा क्षेत्राला नवी प्रेरणा
भोईवाडा येथील सर्वसामान्य कुटुंबातून पुढे येत नूतनने राष्ट्रीय स्तरावर मिळवलेले यश हे अमळनेरमधील नवोदित खेळाडूंसाठी प्रेरणादायी ठरत आहे. तिच्या या उल्लेखनीय कामगिरीबद्दल अमळनेरवासीय, क्रीडाप्रेमी आणि विविध स्तरांतून तिचे अभिनंदन होत असून, आगामी क्रीडा प्रवासासाठी तिला शुभेच्छा दिल्या जात आहेत.
“जिद्द, मेहनत आणि योग्य मार्गदर्शन मिळाले तर ग्रामीण भागातील खेळाडूही राष्ट्रीयच नव्हे, तर आंतरराष्ट्रीय स्तरावर देशाचे नाव उज्ज्वल करू शकतात,” हा संदेश नूतनच्या क्रीडा प्रवासातून अधोरेखित होत आहे.







