शहर पोलिसांनी ‘भाईगिरी’ करणाऱ्या ‘चौकडी’ची गेंदालाल मिल परिसरातून काढली धींड

शहर पोलिसांनी ‘भाईगिरी’ करणाऱ्या ‘चौकडी’ची गेंदालाल मिल परिसरातून काढली धींड
जळगाव : शहरातील गेंदालाल मिल परिसरात दहशत माजविणाऱ्या सराईत टोळीचा डाव शहर पोलिसांनी हाणून पाडला. या टोळीच्या ताब्यातून दोन लोडेड गावठी पिस्तुल, दहा जीवंत काडतुसे आणि चारचाकी वाहन जप्त करण्यात आले. याप्रकरणी चौघांना अटक करून पोलिसांनी त्यांची परिसरातून पायी धींड काढत दहशत माजवणाऱ्यांना ठोस संदेश दिला. या कारवाईचे नागरिकांकडून सर्वत्र कौतुक होत आहे.
शनिवार रात्री गुन्हे शोध पथकातील कर्मचारी गस्त घालत असताना गेंदालाल मिल परिसरातील माजी आमदार सुरेशदादा जैन यांच्या घराजवळ काही संशयित इसम फिरताना दिसले. चौकशीदरम्यान त्यांनी उडवाउडवीची उत्तरे दिल्याने पोलिसांनी त्यांची झडती घेतली असता, एका आरोपीच्या कमरेला लोडेड कट्टा सापडला. तर त्यांच्या कारमध्ये आणखी एक कट्टा व दहा जिवंत काडतुसे आढळली.
या कारवाईत युनूस उर्फ सद्दाम सलीम पटेल (३३, रा. गेंदालाल मिल), सौहील शेख उर्फ दया सीआयडी (२९, रा. शाहूनगर), निजामोद्दीन शेख (३१, रा. आझादनगर) व शोएब शेख (२९, रा. गेंदालाल मिल) या चौघांना अटक करण्यात आली. त्यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
ज्या भागात ही टोळी दहशत माजवत होती, त्याच भागातून पोलिसांनी त्यांची पायी धींड काढल्याने नागरिकांनी समाधान व्यक्त केले. या कारवाईमुळे भाईगिरी करणाऱ्यांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले असून शहर पोलिसांच्या या कारवाईची सर्वत्र चर्चा सुरू आहे.






