
पुरनाड फाट्यावरील अतिक्रमण हटवण्यासाठी पोलीस बंदोबस्तात कारवाई; महामार्ग चौपदरीकरणाला वेग
मुक्ताईनगर, प्रतिनिधी – सुभाष धाडे
पुरनाड फाटा परिसरात महामार्ग चौपदरीकरणाच्या कामास अडथळा ठरणाऱ्या अतिक्रमणावर अखेर प्रशासनाने कारवाईचा बडगा उगारला. आज (सोमवार) सकाळी अकराच्या सुमारास पोलीस बंदोबस्तात ही कारवाई सुरू करण्यात आली.
इंदौर- हैदराबाद एल 753 राष्ट्रीय महामार्ग क्रमांक चे चौपदरीकरण सुरू असून, मुक्ताईनगर तालुक्यातील पुरनाड फाट्यावर काही व्यापाऱ्यांनी व नागरिकांनी अतिक्रमण केले होते. यामुळे चौपदरीकरणाच्या कामाला अडथळा निर्माण होत होता. स्थानिक प्रशासनाने अनेकदा अतिक्रमण काढून घेण्याचे नोटीस बजावूनही अतिक्रमण हटवले गेले नव्हते.
शेवटी आज तहसील प्रशासन, सार्वजनिक बांधकाम विभाग आणि पोलीस प्रशासनाच्या संयुक्त पथकाने पोलीस बंदोबस्तात अतिक्रमण हटवण्याची मोहीम सुरू केली. या कारवाईदरम्यान काही ठिकाणी तणाव निर्माण होण्याची शक्यता लक्षात घेता पोलीस निरीक्षक शशीकांत पाटील कर्मचाऱ्यांसह घटनास्थळी ठाण मांडुन होते. तब्बल सुमारे 200 कर्मचाऱ्यांचा फौजफाटा बंदोबस्तास तैनात करण्यात आला होता. मात्र, कोणताही अनुचित प्रकार घडू न देता शांततेत ही कारवाई पार पडली.
व्यवसायिकांचेही यासाठी सहकार्य असले तरी आज अचानक झालेल्या कारवाईमुळे व्यवसायिकांसह छोटे -मोठे धंदेवाल्यांची तारांबळ उडाली.
सकाळी अकरा वाजेच्या सुमारास मोठ्या फौजफाट्यासह अतिक्रमण काढण्यास सुरुवात होताच.दुकानदारांनी आपिपली दुकाने स्वत:हुन हटविण्यास सुरुवात केली. दरम्यान याठिकाणी असलेला वनविभागाचा तपासणी नाक्याची ईमारत हटविणे तुर्तास थांबविले. वनविभागाकडुन पर्यायी व्यवस्था करण्यात आल्यानंतर तेही अतिक्रमण हटविले जाणार असल्याचे कळते.
महामार्ग चौपदरीकरणाचे काम वेगाने सुरू राहण्यासाठी आवश्यक असलेली ही कारवाई प्रशासनाच्या वतीने करण्यात आली असून, उर्वरित अतिक्रमण हटवण्यासाठी देखील लवकरच पावले उचलली जाणार असल्याचे सूत्रांनी सांगितले आहे.