एमआयडीसीतील मेरीको कंपनीची दोन दिवसांपासून तपासणी; उद्योग क्षेत्रात खळबळ

एमआयडीसीतील मेरीको कंपनीची दोन दिवसांपासून तपासणी; उद्योग क्षेत्रात खळबळ
जळगाव : शहरातील एमआयडीसी परिसरात असलेल्या मेरीको कंपनीत आयकर विभागाच्या पथकाने तपासणी सुरू केली आहे. बुधवारी सकाळपासून सुरू झालेली ही कारवाई गुरुवारपर्यंत अखंड सुरू होती. मुंबईतून आलेल्या आयकर पथकाकडून कंपनीच्या विविध विभागातील आर्थिक व्यवहार आणि कागदपत्रांची सखोल तपासणी केली जात आहे. या कारवाईमुळे जळगावच्या औद्योगिक क्षेत्रात खळबळ उडाली आहे.
पथकातील अधिकारी कंपनीच्या कार्यालयातच थांबून विविध रेकॉर्ड्सची तपासणी करीत असून संपूर्ण प्रक्रियेत काटेकोर गोपनीयता राखली जात आहे. आयकर अधिकाऱ्यांकडून कारवाईविषयी कोणतीही अधिकृत माहिती देण्यात आलेली नाही. तसेच कंपनीच्या अधिकाऱ्यांशी संपर्क साधण्याचा प्रयत्नही निष्फळ ठरला. त्यामुळे या तपासणीमागील नेमके कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही.
. प्रामुख्याने कंपनीच्या आर्थिक व्यवहारांशी संबंधित कागदपत्रांची पडताळणी आणि नोंदींचा तपशील तपासला जात आहे. तपास पूर्ण झाल्यानंतरच या कारवाईतून नेमके काय निष्पन्न होणार, याकडे संपूर्ण औद्योगिक क्षेत्राचे लक्ष लागून आहे.






