मराठा समाजाविषयी आक्षेपार्ह विधान : पोलीस निरीक्षक किरणकुमार बकाले बडतर्फ
पोलीस महासंचालक रश्मी शुक्ला यांचे आदेश : मराठा संघटनांचा पाठपुराव्याला यश

महा पोलीस न्यूज । चेतन वाणी । मराठा समाजाविषयी आक्षेपार्ह विधान केल्याप्रकरणी जळगाव स्थानिक गुन्हे शाखेचे तत्कालीन पोलीस निरीक्षक किरणकुमार बकाले याला सेवेतून बडतर्फ करण्यात आले आहे. पोलीस महासंचालक रश्मी शुक्ला यांनी याबाबत आदेश जारी केले.
बकाले याने अधिनस्त कर्मचाऱ्याशी फोनवर बोलताना मराठा समाजावर आक्षेपार्ह टिप्पणी केली होती. या संभाषणाची ऑडिओ क्लिप सोशल मीडियावर व्हायरल झाल्यानंतर जळगावात मोठी खळबळ उडाली. छत्रपती शिवाजी ब्रिगेड, रयत सेना, संभाजी ब्रिगेड यांसह विविध संघटनांनी तीव्र आंदोलने करत बडतर्फीची मागणी केली होती.
विशेष पोलीस महानिरीक्षकांच्या चौकशीनंतर बकाले यांच्यावर कायदा-सुव्यवस्थेला बाधा आणल्याचा ठपका ठेवण्यात आला. त्यांना समक्ष सुनावणीची संधी दिली असली तरी नवे मुद्दे मांडता न आल्याने सेवेतून बडतर्फीचा निर्णय घेण्यात आला.
संघटनांच्या सातत्यपूर्ण पाठपुराव्यामुळे ही कारवाई शक्य झाली. छत्रपती शिवाजी ब्रिगेडने या निर्णयाचे स्वागत करत हा मराठा समाजाच्या एकजुटीचा आणि सामाजिक न्यायासाठीच्या संघर्षाचा विजय असल्याचे म्हटले आहे.






