मंकी पॉक्सचा पहिला रुग्ण खान्देशात आढळला, संपर्कातील व्यक्तींचा शोध सुरू

महा पोलीस न्यूज । चेतन वाणी । महाराष्ट्र राज्यात मंकी पॉक्स (एमपॉक्स) या विषाणूजन्य आजाराचा पहिला रुग्ण धुळे जिल्ह्यात आढळून आला आहे. या रुग्णावर श्री भाऊसाहेब हिरे शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात उपचार सुरू असून, त्याच्या संपर्कात आलेल्या व्यक्तींचा शोध घेण्यात येत आहे. आरोग्य विभागाने या प्रकरणाची गांभीर्याने दखल घेतली असून, नागरिकांना सतर्क राहण्याचे आवाहन केले आहे.
आरोग्य विभागाच्या अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, हा रुग्ण धुळे जिल्ह्यातील रहिवासी असून तो चार वर्षापासून सौदी अरेबिया येथे राहत होता. दोन दिवसापूर्वी तो परत आल्यावर त्याला मंकी पॉक्सची लक्षणे दिसू लागल्याने तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आले. प्राथमिक तपासणीत त्याची चाचणी सकारात्मक आली असून, हा महाराष्ट्रातील पहिला पुष्टी झालेला केस आहे.
रुग्णाची प्रकृती स्थिर असल्याचे डॉक्टरांनी सांगितले असून, त्याला वेगळे ठेवण्यात आले आहे. मंकी पॉक्स हा एक विषाणूजन्य आजार आहे, जो मुख्यतः संक्रमित व्यक्ती किंवा प्राण्यांच्या संपर्कातून पसरतो. याची मुख्य लक्षणे म्हणजे ताप, डोकेदुखी, स्नायू दुखणे, थकवा आणि त्वचेवर फोड येणे. हे फोड सुरुवातीला लहान असतात आणि नंतर ते पाणी भरलेले होतात, जे काही दिवसांत सुकून जातात. हा आजार सामान्यतः घातक नसतो, परंतु लहान मुले, गर्भवती महिला आणि कमकुवत रोगप्रतिकारक शक्ती असलेल्या व्यक्तींना अधिक धोका असतो.
जागतिक आरोग्य संघटनेने (डब्ल्यूएचओ) मंकी पॉक्सला जागतिक आरोग्य आणीबाणी म्हणून घोषित केले असून, २०२२ पासून जगभरात हजारो केसेस नोंदवल्या गेल्या आहेत. महाराष्ट्रात हा पहिला केस आढळल्याने आरोग्य यंत्रणा सतर्क झाली आहे.
आरोग्य विभागाने नागरिकांना मंकी पॉक्सपासून बचावासाठी मार्गदर्शक सूचना जारी केल्या आहेत. यात हात स्वच्छ धुणे, संक्रमित व्यक्तींशी जवळचा संपर्क टाळणे, आणि लक्षणे दिसल्यास तातडीने डॉक्टरांकडे जाणे यांचा समावेश आहे.






