किरकोळ वादातुन मुलाकडून वडिलांचा खून ; मुक्ताईनगर तालुक्यातील घटना!

किरकोळ वादातुन मुलाकडून वडिलांचा खून ; मुक्ताईनगर तालुक्यातील घटना!
महा पोलीस न्यूज|सुभाष धाडे|I मुक्ताईनगर
बाप लेकांच्या नात्याला काळिमा फासणारी हृदय द्रावक घटना मुक्ताईनगर तालुक्यातील अंतूर्ली येथे काल दि 1 नोव्हे रोजी रात्री घडली. शेत वाटणी संदर्भातील किरकोळ वादातून मुलाने बापाला मारहाण करीत संपविले. या दुर्दैवी घटनेने अंतूर्ली परिसरात खळबळ उडाली आहे
याबाबत सविस्तर वृत्त असे कि, रवींद्र रमेश तायडे (वय 27) इंदिरानगर, फुकटपुरा, अंतूर्ली यांनी पोलिसांत दिलेल्या फिर्यादी नुसार, चुलते जगदीश दामू तायडे (वय 60) यांचा मुलगा गणेश तायडे नेहमीप्रमाणे दारू पिऊन कुटुंबाशी वाद घालत असतो.तायडे कुटुंबाची रावेर तालुक्यातील आंदलवाडी येथे वारस हक्काची तीन एकर शेतजमीन असून ती चुलते मधुकर तायडे कसतात. गणेश हा या जमिनीत हिस्से किंवा वाटणी करण्यासंदर्भात वारंवार वडिलांशी वाद घालत असे. काल 1 नोव्हे रोजी रात्री आठ च्या सुमारास याच करणावरून वाद झालेला होता. रात्री दहाच्या सुमारास गणेश याने पुनः वाटणी संदर्भात विचारणा केली असता, वडिलांनी नकार दिला. यावर गणेश याने रागाच्या भरात वडील जगदीश तायडे यांना लाकडी दांडक्याने बेदम मारहाण करीत रक्तबांबळ केले. मारहाण करून परतत असतांना त्याने चुलतभाऊ रवींद्र तायडे यांस सांगितले कि, ‘मी बापाला मारले, त्याला विहिरीत टाकून देणार!’ रवींद्र याने मित्रांसह धाव घेऊन पहिले असता जगदीश हे रक्ताच्या थारोड्यात दिसले त्यांना गंभीर जखमी केलेले होते. व्हिडीओ रेकॉर्डिंग करीत त्यांना याबाबत विचारले असता, मुलगा गणेशने बेदम मारहाण केल्याचे सांगितले. त्यांना रुग्णवाहिकेने जळगाव येथे रुग्णालयात दाखल करण्यात आले मात्र पहाटे (2 रोजी) त्यांचा उपचारा दरम्यान मृत्यू झाला.
2 रोजी आरोपी गणेश तायडे (वय 25) यांस एका शेतातून अटक करण्यात आली. पोलीस निरीक्षक आशिषकुमार आढसूळ यांनी घटनास्थळी भेट दिली.






