जळगावात पुन्हा मर्डर : ‘चोर पऱ्या’ बोलला म्हणून हर्षलचा गेमच केला!
भांडणानंतर तरुणाचा संशयित खून; आईची शनिपेठ पोलिसांकडे फिर्याद

महा पोलीस न्यूज । चेतन वाणी । जळगाव शहरातील खेडी रोड परिसरात भांडणानंतर ३१ वर्षीय तरुणाचा मृतदेह रेल्वे ट्रॅकवर आढळून आला असून, हा अपघाती मृत्यू नसून खून असल्याचा गंभीर आरोप त्याची आई सौ. ज्योती प्रदीप भावसार यांनी शनिपेठ पोलिसांकडे तक्रारीत केला आहे. पोलिसांनी गुन्हा दाखल करून तपास सुरू केला आहे. मृत तरुणाचे नाव हर्षल प्रदीप भावसार (वय ३१, रा.दिनकर नगर, जुना आसोदा रोड, जळगाव) असे आहे.
फिर्यादीनुसार, दि.१६ नोव्हेंबर रोजी रात्री ७.३० वाजता हर्षलने चिकन आणून आईला जेवण तयार करण्यास सांगितले आणि घरातून बाहेर पडला. रात्री उशीर होऊनही तो घरी आला नाही. दुसऱ्या दिवशी सकाळी त्याचा मोबाईल बंद आढळला. सकाळी ९.३० वाजता हर्षलच्या मित्राने त्याच्या आईला कामावर येऊन “अॅक्सिडेंट झाला आहे, सिव्हीलमध्ये या,” असे सांगत सिव्हील हॉस्पिटलमध्ये घेऊन गेला. पोस्ट मॉर्टम रूममध्ये हर्षलचा मृतदेह स्टेचरवर ठेवलेला दिसला. कान, नाक, डोके व जबड्याजवळ गंभीर जखमा व रक्त दिसून येत असल्याचे त्यांना दिसून आले.
रेल्वे रुळावर मृतदेह, भांडण सीसीटीव्हीत कैद
पोलिसांनी हर्षलचा मृत्यू जळगाव–भादली तिसऱ्या रेल्वे लाईनवर रेल्वेचा फटका लागून झाल्याचे सांगितले. मात्र हर्षलचा मित्र विजय उर्फ भुरा सपकाळे हा सिव्हीलमध्ये उपस्थित होता. त्याने सांगितले की, सीसीटीव्ही तपासात दि.१६ नोव्हेंबर रोजी रात्री १० ते १०.३० दरम्यान ओंकार हॉटेल, खेडी रोड येथे हर्षलचे भुषण संजय महाजन व लोकेश मुकुंदा महाजन यांच्यासोबत भांडण झाले असल्याचे दिसून आले.
रेल्वे रुळावर फेकले
मारहाण केल्यानंतर भुषण संजय महाजन, लोकेश मुकुंदा महाजन, परेश संजय महाजन यांनी मिळून हर्षलला ओंकार हॉटेल व काशिबाई शाळेच्या मागील रस्त्यावर मारहाण केली आणि त्यानंतर मोटारसायकलवर बसवून घेऊन गेल्याचे पोलिसांनी सांगितल्याचे फिर्यादीत नमूद आहे. आईचा आरोप आहे की, तिघांनी मिळून हर्षलचा खून करण्याच्या हेतूने त्याला भादली तिसऱ्या रेल्वे लाईनवर टाकून दिले, ज्यामुळे त्याचा रेल्वे फटक्यात त्याचा मृत्यू झाला.
कुटुंबीयांवर मानसिक आघात, फिर्याद दाखल
घटनेनंतर ज्योती भावसार यांना मानसिक धक्का बसला होता. त्यांचे पती आजारपणामुळे बाहेरगावी उपचारासाठी गेले असल्याने त्या तक्रार देऊ शकल्या नव्हत्या. नंतर भाऊ मयुर भावसार आणि बहिण रूपाली भावसार यांच्या सोबत त्या शनिपेठ पोलीस स्टेशनला आल्या. तिघांविरुद्ध मारहाण व खून केल्याचा संशय व्यक्त करत ज्योती यांनी अधिकृत फिर्याद दाखल केली आहे. पोलिसांनी गुन्हा दाखल करून तपास सुरू केला
एकाला केली अटक, दोघांचा शोध सुरू
शनिपेठ पोलिसांनी भुषण महाजन, लोकेश महाजन व परेश महाजन यांच्यावर हर्षलच्या खुनाबाबत गुन्हा नोंदवून तपासाला सुरुवात केली आहे. सीसीटीव्ही फुटेज, मोबाईल लोकेशन व इतर तांत्रिक तपासाच्या आधारे पुढील पावले उचलण्यात येत आहेत. पोलिसांनी भुषण यास अटक केली असून पुढील तपास सहाय्यक निरीक्षक साजीद मन्सुरी करीत आहेत. तपासात आणखी धक्कादायक माहिती समोर येण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.






