दुचाकी झाडावर आदळल्याने दोन जिवलग मित्रांचा जागीच मृत्यू

दुचाकी झाडावर आदळल्याने दोन जिवलग मित्रांचा जागीच मृत्यू
चोपडा तालुक्यातील मामलदे फाट्याजवळील घटना
चोपडा | प्रतिनिधी
नियंत्रण सुटल्याने दुचाकी झाडावर आदळून झालेल्या अपघातामध्ये दोन तरुण जागीच ठार झाल्याची दुर्दैवी घटना 16 ऑक्टोबर रोजी सायंकाळी साडेसहा वाजेच्या सुमारास मामलदे फाट्याजवळ घडली. मृतांमध्ये मामलदे येथील अमोल ज्ञानेश्वर पाटील (वय २५) व पृथ्वीराज चंद्रकांत पाटील (वय २३) या दोघांचा समावेश आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, अमोल व पृथ्वीराज हे दोघे यामाहा कंपनीच्या नव्या स्पोर्ट्स बाईकवरून मामलदेहून चोपड्याकडे येत असताना मामलदे फाट्याजवळ दुचाकीवरील नियंत्रण सुटून झाडावर जोरदार धडक बसली. या भीषण अपघातात दोघांचाही जागीच मृत्यू झाला. अपघाताची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत मृतदेह चोपडा उपजिल्हा रुग्णालयात हलविले, मात्र तेथे डॉ. स्वप्ना पाटील यांनी तपासून दोघांनाही मृत घोषित केले.
अपघातानंतर उपजिल्हा रुग्णालय परिसरात नातेवाईक व ग्रामस्थांचा मोठा आक्रोश पाहायला मिळाला. या वेळी पोलीस निरीक्षक मधुकर साळवे यांच्यासह पोलीस पथक उपस्थित होते. दोन्ही तरुणांवर १७ ऑक्टोबर रोजी मामलदे येथे अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत. या दुर्दैवी घटनेमुळे मामलदे परिसरात शोककळा पसरली आहे.
दसऱ्याला घेतली होती नवीन बाईक
मयत पृथ्वीराज पाटील याचे सुरत येथे कापड दुकान असून त्याने दसऱ्याच्या दिवशीच नवीन स्पोर्ट्स बाईक खरेदी केली होती. दिवाळी निमित्त तो दोन दिवसांपूर्वी मामलदे येथे घरी आला होता. १६ रोजी अमोलसोबत बाहेर पडताना झालेल्या या अपघातात दोघांचाही मृत्यू झाला.
आ. सोनवणे यांची रुग्णालयात धाव
अपघाताची माहिती मिळताच आमदार प्रा. चंद्रकांत सोनवणे यांनी उपजिल्हा रुग्णालयात भेट देऊन नातेवाईकांचे सांत्वन केले आणि आवश्यक त्या सर्व मदतीचे आश्वासन दिले. तसेच माजी विधानसभा अध्यक्ष अरुणभाई गुजराथी, माजी आमदार कैलास पाटील, सभापती नरेंद्र पाटील, शशिकांत पाटील, देवेंद्र पाटील, शुभम चौधरी आदी मान्यवरही रुग्णालयात उपस्थित होते.
अमोलच्या विवाहाची तयारी सुरू होती
मयत अमोल पाटील हा बियाणे कंपनीत कार्यरत होता. तो एकुलता एक असून त्याचे लग्न ठरले होते. साखरपुड्याची तयारी सुरू असतानाच या अपघातात त्याचा मृत्यू झाल्याने कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे.
दोन्ही घरांतील दीपक विझला
अमोल आणि पृथ्वीराज हे घट्ट मित्र होते आणि दोघेही आपल्या कुटुंबातील एकुलते एक पुत्र असल्याने दोन्ही घरांतील दीपक विझल्याची भावना परिसरात व्यक्त होत आहे. पृथ्वीराज हा सोशल मीडियावर ‘रिल्स स्टार’ म्हणून परिचित होता. त्यांच्या पश्चात आई-वडील आणि बहिण असा परिवार आहे.
या दुर्दैवी घटनेने चोपडा तालुक्यात शोककळा पसरली आहे.






