गुन्हा : हसल्याच्या रागातून ज्वेलरी दुकानात घुसून व्यावसायिकाला बेदम मारहाण

महा पोलीस न्यूज । दि.२४ डिसेंबर २०२४ । जळगाव शहरातील सराफ बाजारात एका ज्वेलरी दुकानदाराला भरदिवसा दुकानात घुसून बेदम मारहाण केल्याची घटना सोमवारी घडली. हॉटेलमध्ये जेवताना हास्यविनोद झाल्यावर हसल्याचा राग आल्याने ही मारहाण करण्यात आली. याप्रकरणी शनिपेठ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
भवानी पेठेतील सराफ बाजारात रविंद्र रामदास पाटील यांचे इमिटेशन ज्वेलरीचे दुकान आहे. दि.२२ रोजी ते मित्रांसह रात्री कालिंका माता मंदिराजवळील हॉटेलमध्ये जेवणासाठी गेले होते. टेबलवर हास्यविनोद झाला असता ते हसल्याने शेजारी टेबलवर बसलेला दिपक राजेंद्र चौधरी उर्फ मच्छी याला राग आला. माझ्याकडे पाहून हसल्याचा समज झाल्याने त्याने रविंद्र पाटील यांना शिवीगाळ केली. प्रत्युत्तर म्हणून त्यांनी देखील शिवीगाळ केली, तेव्हा एका मित्राने मध्यस्थी करत वाद मिटवला.
दुकानात घुसून केले रक्तबंबाळ
सोमवारी दुपारी १.३० वाजेच्या सुमारास रविंद्र पाटील हे आपल्या दुकानात असताना दीपक चौधरी उर्फ मच्छी हा दोन अनोळखी इसमांसह त्याठिकाणी आला. रात्रीच्या वादातून तिघांनी त्यांना बेदम मारहाण केली. त्यावेळी एकाने हातातील कडे काढून रविंद्र पाटील यांच्या डोक्यात मारल्याने ते रक्तबंबाळ झाले. आवाज ऐकून शेजारच्या दुकानातील लोकांनी धाव घेत त्यांना सोडवले आणि रुग्णालयात दाखल केले.
शनिपेठ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल
दुकानात घुसून मारहाण केल्याप्रकरणी रविंद्र पाटील यांच्या फिर्यादीवरून शनिपेठ पोलीस ठाण्यात दीपक राजेंद्र चौधरी उर्फ मच्छी, महिर प्रल्हाद भिडे, कल्पेश सुरेश मोरे सर्व रा.तेली चौक जळगाव यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास हवालदार प्रतिभा पाटील करीत आहेत.