Social

जिल्ह्यात २ हजार ९४६ गणेश मंडळांची होणार स्थापना ; पोलीस दल ‘अ‍ॅक्शन मोड’वर

महा पोलीस न्यूज । दि.२७ ऑगस्ट २०२५ । लाडक्या बाप्पाच्या आगमनासाठी जळगाव जिल्ह्यात जय्यत तयारी सुरू आहे. बुधवारी, २७ ऑगस्ट रोजी गणेश चतुर्थीला गणेशोत्सवाला सुरुवात होणार असून, यंदा जिल्ह्यात तब्बल २ हजार ९४६ मंडळांकडून गणपतीची स्थापना केली जाणार आहे. या उत्सवादरम्यान कोणताही अनुचित प्रकार घडू नये यासाठी जिल्हा पोलीस दल ‘अ‍ॅक्शन मोड’वर काम करत आहे.

गणेश मंडळांचा उत्साह

जिल्ह्यात एकूण २ हजार ९४६ मंडळे गणेशोत्सव साजरा करणार आहेत. यामध्ये २ हजार ८९ सार्वजनिक गणेश मंडळे आणि ६९७ खासगी मंडळांचा समावेश आहे. विशेष म्हणजे, जिल्ह्यातील १६० गावांनी ‘एक गाव एक गणपती’ या उपक्रमात सहभाग घेतला आहे, जो सामाजिक एकतेचे एक चांगले उदाहरण आहे.

पोलिसांचा कडेकोट बंदोबस्त

गणेशोत्सव निर्विघ्न पार पाडण्यासाठी गेल्या दोन महिन्यांपासूनच जिल्हा पोलीस दलाकडून तयारी सुरू होती. उपद्रवी व्यक्ती आणि गुन्हेगारी पार्श्वभूमी असलेल्यांवर कारवाई करण्यात येत आहे. पोलिस अधीक्षक डॉ. महेश्वर रेड्डी यांनी गणेशोत्सव काळात विशेष बंदोबस्त ठेवण्याचे आदेश दिले आहेत.

या बंदोबस्तात १ पोलीस अधीक्षक, २ अपर पोलीस अधीक्षक, ८ पोलीस उपअधीक्षक, एसआरपीची १ कंपनी, आरएएफची १ कंपनी, १८०० पुरुष होमगार्ड आणि २५० महिला होमगार्ड तैनात राहणार आहेत. या व्यतिरिक्त, पोलिस निरीक्षक, सहायक निरीक्षक, पोलीस उपनिरीक्षक आणि इतर अंमलदारांचे पथक, आरसीपी प्लाटून, स्ट्रायकिंग फोर्स आणि क्यूआरटी पथकेही सज्ज असतील.

गुन्हेगारांवर कारवाईचा बडगा

पोलिसांनी गणेशोत्सवापूर्वीच गुन्हेगारी पार्श्वभूमी असलेल्यांवर कारवाईचा बडगा उगारला आहे. आतापर्यंत २ जणांवर एमपीडीए कायद्यांतर्गत कारवाई, २ जणांना हद्दपार, २५५ जणांना जिल्ह्याबाहेर पाठवणे आणि ८०० जणांकडून बाँड लिहून घेण्यात आले आहेत.

‘डीजेमुक्त’ गणेशोत्सवाचे आवाहन

पोलिसांनी नागरिकांना ‘डीजेमुक्त’ गणेशोत्सव साजरा करण्याचे आवाहन केले आहे. डीजेच्या कर्कश आवाजाऐवजी पारंपरिक वाद्ये वाजवून हा उत्सव साजरा करावा, अशा सूचना वेळोवेळी झालेल्या बैठकांमध्ये देण्यात आल्या आहेत.

पहा संपूर्ण व्हिडिओ :

Chetan Wani

पत्रकारिता क्षेत्रात गत १५ वर्षांपासून कार्यरत. क्राईम रिपोर्टींगचा १२ वर्षांचा प्रदीर्घ अनुभव. राजकारण, महापालिका, उद्योग जगतातील विशेष लेखन. मंत्रालय, माहिती व जनसंपर्क विभागातील पत्रकारितेचा अनुभव. लोकसभा, विधानसभा, मनपा निवडणूक काळात मीडिया मॅनेजमेंट. मोबाईल नंबर : 9823333119

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button