जळगाव जिल्हा परिषदेचे AI पाऊल, नागरिकांसाठी ‘व्हॉट्सअॅप चॅटबॉट’ सुरू

महा पोलीस न्यूज । दि.२५ ऑगस्ट २०२५ । जळगाव जिल्हा परिषदेने नागरिकांच्या सोयीसाठी एक अभिनव डिजिटल उपक्रम सुरू केला आहे. जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी मीनल करनवाल (भा.प्र.से.) यांच्या संकल्पनेतून ‘व्हॉट्सअॅप चॅटबोट’ सेवेची सुरुवात करण्यात आली आहे. या सेवेद्वारे नागरिकांना तक्रारी नोंदवणे आणि जिल्हा परिषदेच्या योजनांबाबत माहिती मिळवणे अधिक सुलभ होणार आहे.
या चॅटबोट सुविधेचा लाभ घेण्यासाठी नागरिकांनी जिल्हा परिषदेच्या अधिकृत व्हॉट्सअॅप क्रमांकावर 📞 9421610645) संदेश पाठवून आपली तक्रार नोंदवावी किंवा माहिती प्राप्त करावी. ही सेवा जिल्हा परिषदेच्या संकेतस्थळावर (http://zpjalgaon.gov.in) देखील उपलब्ध आहे.
या उपक्रमामुळे नागरिकांना जिल्हा परिषदेच्या विविध विभाग, योजना आणि सेवांबाबत माहिती सहज उपलब्ध होईल. तसेच, तक्रारींचे त्वरित निवारण करणे शक्य होणार आहे. हा उपक्रम डिजिटल गव्हर्नन्स आणि ई-गव्हर्नन्सच्या माध्यमातून प्रशासनाला अधिक पारदर्शक आणि नागरिकाभिमुख बनवण्याच्या दिशेने महत्त्वपूर्ण पाऊल आहे.
मुख्य कार्यकारी अधिकारी मीनल करनवाल यांनी सांगितले, “नागरिकांपर्यंत प्रशासनाच्या सेवा जलद आणि प्रभावीपणे पोहोचवणे हे आमचे उद्दिष्ट आहे. या चॅटबोट सेवेद्वारे नागरिकांना तक्रारी नोंदवणे आणि माहिती मिळवणे सोपे होईल. हा उपक्रम प्रशासनाला अधिक कार्यक्षम आणि पारदर्शक बनवण्यास मदत करेल.”
जळगाव जिल्हा परिषदेचा हा नाविन्यपूर्ण उपक्रम नागरिकांच्या समस्या आणि गरजा त्वरित समजून घेण्यासाठी आणि त्यांचे निराकरण करण्यासाठी एक प्रभावी व्यासपीठ ठरणार आहे.






