एमआयडीसी पोलिसांची कंजरवाड्यात धडक कारवाई; हजारो लिटर हातभट्टी दारू नष्ट

जळगाव: जळगावातील कंजरवाडा परिसरात मोठ्या प्रमाणावर हातभट्टी दारू तयार केली जात असल्याची माहिती मिळाल्यानंतर एमआयडीसी पोलिसांनी धडक कारवाई केली. या कारवाईत पोलिसांनी अडीच ते तीन हजार लिटर कच्चे रसायन आणि दारू तयार करण्याचे साहित्य जागेवरच नष्ट केले.
पोलिसांना कंजरवाडा परिसरात अवैध हातभट्टी दारू तयार होत असल्याची गुप्त माहिती मिळाली होती. या माहितीच्या आधारे सहायक पोलीस निरीक्षक गणेश वाघ यांनी त्यांच्या पथकासह, कंजरवाडा येथील बीट क्रमांक १ मध्ये सापळा रचला.
पोलिसांनी केलेल्या या अचानक कारवाईमुळे परिसरात खळबळ उडाली. पोलिसांना पाहताच काही आरोपी घटनास्थळावरून पळून गेले. मात्र, पोलिसांनी दारू तयार करण्यासाठी वापरले जाणारे सुमारे अडीच ते तीन हजार लिटर कच्चे रसायन आणि इतर संबंधित साहित्य जागेवरच नष्ट केले. या कारवाईमुळे अवैध दारू निर्मितीच्या रॅकेटला मोठा धक्का बसला आहे.
या कारवाईदरम्यान, दोन ते तीन महिला आणि पुरुषांना पोलिसांनी ताब्यात घेतले. त्यांच्यावर एमआयडीसी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून, पोलीस पुढील तपास करत आहेत. या कारवाईत सहायक पोलीस निरीक्षक गणेश वाघ यांच्यासह पोहेकॉ चंद्रकांत पाटील, किशोर निकुंभ, पोना आकाश राजपूत, रितेश वंजारी आणि कविता गवई यांचा सहभाग होता.






