
विद्यापीठस्तरीय कुलगुरू युवा प्रेरणा शिबिराचा उत्साहात समारोप
जळगाव, दि. १४ (प्रतिनिधी):कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठाच्या राष्ट्रीय सेवा योजना कक्षातर्फे आयोजित विद्यापीठस्तरीय कुलगुरू युवा प्रेरणा शिबिराचा समारोप आज विद्यापीठाचे प्र-कुलगुरू प्रा. एस. टी. इंगळे यांच्या प्रमुख उपस्थितीत पार पडला.
समारोप समारंभाच्या वेळी मंचावर व्यवस्थापन परिषद सदस्य ॲड. अमोल पाटील, नितीन झाल्टे, प्रा. म.सु. पगारे, प्रा. पवित्रा पाटील, कुलसचिव डॉ. विनोद पाटील, अधिसभा सदस्य अमोल मराठे, स्वप्नाली काळे, नितीन ठाकूर, केदारनाथ कवडीवाले तसेच रा.से.यो. संचालक डॉ. सचिन नांद्रे उपस्थित होते.
प्र-कुलगुरू प्रा. इंगळे यांनी विद्यार्थ्यांमध्ये राष्ट्रभक्ती, वक्तशीरपणा, स्वयंशिस्त आणि उद्योजकतेसारखे गुण वृद्धिंगत व्हावेत, यासाठी अशा शिबिरांचे आयोजन महत्त्वाचे असल्याचे सांगितले. त्यांनी शिबिरातील विविध विषयांवर झालेल्या व्याख्यानांचा उल्लेख करत विद्यार्थ्यांनी याचा उपयोग जीवनात करावा, असेही सांगितले.
ॲड. अमोल पाटील यांनी रा.से.यो. स्वयंसेवकांच्या योगदानाचे कौतुक करत विद्यार्थ्यांनी शिस्तबद्ध आणि सामाजिकदृष्ट्या सजग जीवन जगावे, असे प्रतिपादन केले.
या सात दिवसांच्या शिबिरात एकूण २५० स्वयंसेवक सहभागी झाले होते. यामध्ये १२३ मुली आणि १२७ मुले यांचा समावेश होता. शिबिरात सामाजिक, बौद्धिक, आणि सांस्कृतिक कार्यक्रमांचा समावेश होता. संचालक डॉ. सचिन नांद्रे यांनी शिबिराचा सविस्तर अहवाल सादर केला.
समारोप कार्यक्रमात चंद्रदीप बाविस्कर, प्रेरणा भालेराव, रोहन गावित, स्नेहा बारी, सनी पवार, हर्षदा गिरासे, दिव्या पाटील आणि सागर कोळी या स्वयंसेवकांनी मनोगते व्यक्त केली.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा. दिनेश पाटील यांनी केले तर आभारप्रदर्शन प्रा. विजय पाटील यांनी मानले.