जय किसान फायनान्सचा संचालक शेतकऱ्यांचे 40 लाख रुपये घेऊन फरार
दारव्हा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल

जय किसान फायनान्सच्या संचालक शेतकऱ्यांचे 40 लाख रुपये घेऊन फरार
दारव्हा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल
दारव्हा प्रतिनिधी
दारव्हा येथील गजानन नगर भागात प्रशांत रामचंद्र खरे (रा. पाटोदा, ता. चिखली, जि. बुलडाणा) याने 2024 मध्ये जय किसान मायक्रो फायनान्स नावाने संस्था स्थापन करून कार्यालय सुरू केले. शेतकऱ्यांना कमी व्याजदरात कर्ज मिळेल, असे आमिष दाखवून त्याने लोन प्रोसेसिंग फी, जीएसटी आणि डाऊन पेमेंटच्या नावाखाली शेकडो शेतकऱ्यांकडून लाखो रुपये उकळले. शेतकऱ्यांना फेब्रुवारी अखेरपर्यंत पीक कर्ज मिळेल, असे सांगून त्याने अधिकाधिक शेतकऱ्यांना या फसवणुकीच्या जाळ्यात ओढले.
यासाठी प्रशांत खरे याने प्रविण मधुकर ऊके (रा. दारव्हा) याची कमिशन एजंट म्हणून नियुक्ती केली.
फेब्रुवारी महिना संपल्यानंतरही कर्ज न मिळाल्याने शेतकऱ्यांनी तगादा लावला असता, प्रशांत खरे रातोरात शेतकऱ्यांचे कागदपत्रे आणि जमा केलेली रक्कम घेऊन पसार झाला. फसवणुकीची जाणीव होताच शेतकऱ्यांनी तातडीने पोलीस ठाणे गाठले. आतापर्यंतच्या तक्रारींवरून प्रशांत खरेने एकूण 160 शेतकऱ्यांची 39 लाख 40 हजार 330 रुपये घेऊन फरार झाल्याचे स्पष्ट झाले आहे.
पीडित शेतकरी गणेश बंडू जाधव (वय 49, रा. उचेगाव, ता. दारव्हा) यांच्या तक्रारीवरून दारव्हा पोलीस ठाण्यात प्रशांत खरे आणि प्रविण ऊके यांच्या विरोधात गुन्हा क्रमांक 141/2025, कलम 318 (4), 3(5) भारतीय न्याय संहिता-2023 नुसार 9 मार्च 2025 रोजी गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
सदर गुन्ह्याचा तपास पोलीस अधीक्षक कुमार चिता, अपर पोलीस अधीक्षक पियूष जगताप, सहायक पोलीस अधीक्षक तथा उपविभागीय पोलीस अधिकारी चिलुमुला रजनीकांत आणि पोलीस निरीक्षक विलास कुलकर्णी यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक शिवशंकर कायंदे आणि पोलीस पथक करीत आहे.