ब्रेकींग : कजगावात एकाच रात्री चार घर फोडले, सीसीटीव्हीत चोरटे कैद

महा पोलीस न्यूज । निलेश पाटील । भडगाव तालुक्यातील कजगाव येथे रविवारी दि.१८ ऑगस्ट रोजी मध्यरात्रीच्या सुमारास चोरट्यांनी एकाच परिसरातील चार बंद घरांना लक्ष्य करत घरफोडी केली आहे. ही घटना शंकर नगर आणि स्टेशन रोड परिसरात घडली असून, चोरटे सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाले आहेत. यामुळे गावात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, चोरट्यांनी शंकर नगर येथील रहिवासी यशवंत उत्तम मोरे यांच्या घरातून सुमारे पंधरा ते वीस हजार रुपये चोरले. त्यानंतर त्यांनी अजय सिंग प्रतापसिंग पाटील, एका बँक कर्मचाऱ्याचे बंद घर आणि वर्धमान चोरडिया यांच्या घराचे कुलूप तोडले. मात्र, या तीन घरांमध्ये त्यांच्या हाती काहीही लागले नाही.
स्वामी समर्थ मंदिराच्या जवळील सीसीटीव्ही फुटेज तपासले असता, पाच चोरटे संशयास्पदरीत्या परिसरात फिरताना दिसले आहेत.
घटनेची माहिती मिळताच भडगाव पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक महेश शर्मा, पोलीस कॉन्स्टेबल दत्तू पाटील, पोलीस हवालदार किशोर सोनवणे आणि गावाचे पोलीस पाटील राहुल पाटील यांनी तातडीने घटनास्थळी धाव घेऊन पाहणी केली. या घटनेमुळे ग्रामस्थांनी कजगाव पोलीस मदत केंद्रावर दिवसा आणि रात्री दोन पोलीस कर्मचाऱ्यांची नियुक्ती करण्याची आणि रात्रीची गस्त वाढवण्याची मागणी केली आहे.
पोलिसांनी या घटनेचा तपास सुरू केला असून लवकरच चोरट्यांना पकडण्यात येईल, असे आश्वासन त्यांनी दिले आहे.






