अवकाळी पावसामुळे खरीप हंगाम उद्ध्वस्त ; तात्काळ पंचनामे करून मदत द्यावी

अवकाळी पावसामुळे खरीप हंगाम उद्ध्वस्त ; तात्काळ पंचनामे करून मदत द्यावी
माजी आमदार साहेबराव पाटील यांची मागणी ; आ. अनिल पाटील यांना निवेदन
अमळनेर प्रतिनिधी केंद्र शासनाने निश्चित केलेल्या १२ नैसर्गिक आपत्तींपलीकडे, राज्य शासनाने ३० जानेवारी २०१४ च्या शासन निर्णयान्वये ‘अवेळी पाऊस’ आणि २२ जून २०२३ च्या शासन निर्णयान्वये ‘सततचा अवेळी पाऊस’ यांनाही नैसर्गिक आपत्ती म्हणून घोषित केले आहे. या पार्श्वभूमीवर अमळनेर विधानसभा मतदारसंघात ऑक्टोबर २०२५ महिन्यात ७ ते ८ दिवस सतत झालेल्या अवकाळी पावसामुळे संपूर्ण खरीप हंगामाचे मोठे नुकसान झाले आहे.
या पावसामुळे शेतकऱ्यांची पिके उध्वस्त झाली असून त्यांना आर्थिक संकटाचा मोठा फटका बसला आहे. त्यामुळे स्थानिक प्रशासनाने तात्काळ पीक नुकसानीचे सरसकट पंचनामे करून संबंधित विभागांकडे प्रस्ताव पाठवून शेतकऱ्यांना मदत मिळावी, अशी मागणी माजी आमदार व कृषिभूषण साहेबराव पाटील यांनी केली आहे.
या संदर्भात साहेबराव पाटील यांनी ‘सिंदूर’ सह लेखी निवेदन आमदार अनिल पाटील यांना देत प्रशासनाने विलंब न करता आपले शासकीय कर्तव्य पार पाडावे आणि शेतकऱ्यांना तातडीने मदत मिळेल याची खात्री करावी, अशी मागणी केली आहे.






