अमळनेर नगरपरिषद निवडणूक : ज्योती पंकज शेटे यांचा प्रभाग १४ मधून उमेदवारी अर्ज दाखल

महा पोलीस न्यूज | चेतन वाणी | आगामी अमळनेर नगरपरिषद निवडणुकीसाठी प्रभाग क्रमांक १४ अ मधून सौ. ज्योती पंकज शेटे यांनी आपला उमेदवारी अर्ज निवडणूक अधिकारी यांच्या दालनात दाखल केला. कोणत्याही प्रकारचे मोठे शक्तीप्रदर्शन न करता, अत्यंत साध्या आणि विनम्र पद्धतीने त्यांनी ही प्रक्रिया पूर्ण केली. यावेळी त्यांनी प्रभागातील जनतेचा उत्स्फूर्त आशीर्वाद घेतला.
‘विकास आणि महिला सक्षमीकरण’ हा प्रमुख अजेंडा
उमेदवारी अर्ज दाखल केल्यानंतर ज्योती शेटे यांनी पत्रकारांशी संवाद साधताना आपला ‘सर्वांगीण विकासाचा अजेंडा’ स्पष्ट केला. मूलभूत सोयी-सुविधा पुरवण्यासोबतच महिला सक्षमीकरण आणि लघु उद्योगांच्या विकासाला त्यांनी सर्वोच्च प्राधान्य देण्याचे ठरवले आहे. “प्रभागातील नागरिकांनी माझ्यावर जो विश्वास दाखवला आहे, त्याला मी कधीही तडा जाऊ देणार नाही,” असे आश्वासन त्यांनी दिले. “पाणी, रस्ते आणि आरोग्य या मूलभूत गरजांवर माझा विशेष भर असेल. नागरिकांच्या समस्या सोडवण्यासाठी मी सदैव तत्पर राहीन,” असे त्यांनी स्पष्ट केले.
महिला उद्योग, बचत गटांना प्रोत्साहन देण्याचे आश्वासन
ज्योती शेटे यांनी आपल्या अजेंड्यात महिला सक्षमीकरणाच्या मुद्द्यावर जोर दिला. महिलांना स्वतःच्या पायावर उभे करण्यासाठी त्या विशेष प्रयत्न करणार आहेत. “मी महिला उद्योग बचत गटांना प्रोत्साहन देईन आणि त्यांच्यासाठी आवश्यक शासकीय योजना आणि निधी उपलब्ध करून देण्यासाठी प्रयत्न करेन. माझ्या उमेदवारीने प्रभागातील महिलांना एक सशक्त आवाज मिळेल,” असे त्या म्हणाल्या.
प्रभाग क्र.१४ अ मध्ये चुरशीची लढत अपेक्षित
सामाजिक क्षेत्रात ज्योती शेटे यांचे पती पंकज शेटे आणि कुटुंबाने केलेले काम प्रभावी ठरले आहे. नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद आणि पाठिंबा घेऊन अर्ज दाखल केल्यामुळे, प्रभाग क्रमांक १४ (अ) मधील लढत आता अत्यंत चुरशीची होणार आहे. ज्योती शेटे यांच्या प्रवेशामुळे नगरपरिषद निवडणुकीत नक्कीच रंगत येणार असून, त्यांच्या उमेदवारीकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.






