२० वर्षीय तरुणाची आत्महत्या ; बोहर्डी येथील घटना

वरणगाव प्रतिनिधी I एका २० वर्षीय तरुणाने गळफास लावून आत्महत्या केल्याची दुर्दैवी घटना १५ सप्टेंबर रोजी तालुक्यातील बोहर्डी बुद्रुक गावात पहाटे उघडकीस आली. देवानंद गजानन गोपाळ (वय २०) असे या तरुणाचे नाव आहे. या घटनेमुळे गावात हळहळ व्यक्त होत आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, ही घटना १५ सप्टेंबर रोजी सकाळी ४ वाजताच्या सुमारास घडली. घटनेची माहिती मिळताच देवानंदच्या कुटुंबीयांनी, रमेश रायसिंग गोपाळ यांनी वरणगाव पोलिस ठाण्यात धाव घेऊन खबर दिली.
पोलिसांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेतली. सहाय्यक पोलिस निरीक्षक अमितकुमार प्रतापसिंग बागुल यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस हेड कॉन्स्टेबल यासीन पिजारी आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी घटनास्थळाचा पंचनामा केला. त्यानंतर मृतदेह शवविच्छेदनासाठी वरणगाव ग्रामीण रुग्णालयात पाठवण्यात आला.
या घटनेची वरणगाव पोलिस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद (अ.मृ. क्र. ३०/२०२५) करण्यात आली आहे. आत्महत्येचे नेमके कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही आणि पोलिस या प्रकरणाचा पुढील तपास करत आहेत. या घटनेमुळे गावात आणि परिसरात शोककळा पसरली आहे






