जळगाव जिल्ह्यातील रुग्णवाहिका चालकांची दिवाळी अंधारात
वेतन रखडल्याने कुटुंबांवर संकट ; प्रशासनाच्या उदासीनतेमुळे नाराजी

जळगाव जिल्ह्यातील रुग्णवाहिका चालकांची दिवाळी अंधारात
वेतन रखडल्याने कुटुंबांवर संकट ; प्रशासनाच्या उदासीनतेमुळे नाराजी
जळगाव प्रतिनिधी
दिवाळी — आनंद, प्रकाश आणि उत्सवाचा सण! मात्र, जळगाव जिल्ह्यातील १०२ रुग्णवाहिका चालकांसाठी यंदाची दिवाळी अंधारात जाण्याची भीती निर्माण झाली आहे. कारण, गेल्या अनेक महिन्यांपासून या चालकांचे वेतन रखडलेले असून, दिवाळीच्या उंबरठ्यावरही त्यांच्या हाती पगार पडलेला नाही. परिणामी सण, खरेदी आणि कुटुंबाच्या उदरनिर्वाहाचा ताण या कर्मचाऱ्यांवर आला आहे.
जिल्हा परिषदेच्या अखत्यारीतील विविध प्राथमिक आरोग्य केंद्रे, उपजिल्हा व जिल्हा रुग्णालयांमध्ये कार्यरत हे १०२ चालक २४ तास रुग्णसेवेत व्यस्त असतात. अपघातग्रस्त, गरोदर माता, आपत्कालीन रुग्णांना योग्य वेळी उपचार मिळावेत यासाठी हे चालक जीवाचे रान करतात. मात्र, एवढी महत्त्वाची सेवा देऊनही त्यांना वेळेवर पगार न मिळणे ही व्यवस्थेची शोकांतिका ठरत आहे.
या परिस्थितीमुळे चालकांनी अलीकडेच जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी मीनल करनावाल यांची भेट घेऊन आपली व्यथा मांडली होती. त्यावेळी ‘लवकरच वेतन मिळेल’ असे आश्वासन देण्यात आले होते. पण, अनेक आठवडे उलटूनही वेतनाच्या बाबतीत कोणतीच ठोस कृती झालेली नाही. त्यामुळे चालकांमध्ये तीव्र नाराजी आणि असंतोष आहे.
या संदर्भात जिल्हा परिषदेचे वरिष्ठ अधिकारी श्री. येवले यांनी सांगितले की, “सध्या चालकांचा डेटा व अकाउंट क्रमांक सेव करण्याचे काम सुरू आहे. प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतरच वेतन दिले जाईल.” मात्र, वेतन मिळण्यासाठी किती वेळ लागेल हे निश्चित सांगता येत नाही, असे त्यांनी स्पष्ट केले.
दरम्यान, दिवाळीच्या तोंडावर चालकांच्या घरात ना फराळ, ना नवीन कपडे, ना उत्सवाची चाहूल. काहींनी तर हातउधार घेऊन संसार चालवण्याची वेळ आली आहे. एक चालक म्हणाला, “रुग्णासाठी आम्ही आमचे जेवण, झोप आणि घर विसरतो, पण आमच्यासाठी मात्र कोणीच बोलत नाही.”
या गंभीर प्रश्नाकडे राजकीय पदाधिकारी आणि लोकप्रतिनिधींनी तातडीने लक्ष देण्याची मागणी चालकांकडून होत आहे. हा प्रश्न केवळ पगारापुरता नसून कुटुंबाच्या जगण्याशी आणि आत्मसन्मानाशी निगडीत असल्याने, प्रशासनाने तत्काळ ठोस उपाययोजना करणे अत्यावश्यक ठरले आहे.






