शेतात सुरू असलेल्या पत्त्याच्या जुगार अड्यावर पोलिसांचा छापा; पाचजण अटकेत

शेतात सुरू असलेल्या पत्त्याच्या जुगार अड्यावर पोलिसांचा छापा; पाचजण अटकेत
कासोदा पोलिसांची कारवाई
कासोदा, (प्रतिनिधी) – कासोदा शहरातील साईबाबा मंदिराजवळ भवानी नगर परिसरात लिंबाच्या झाडाखाली सुरू असलेल्या पत्त्याच्या जुगार अड्ड्यावर कासोदा पोलिसांनी छापा टाकून पाच जणांना रंगेहाथ अटक केली. पोलिसांनी १३ हजार ७५० रुपये रोख रक्कम आणि तीन मोटारसायकली असा एकूण १ लाख ४३ हजार ७५० रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त केला आहे.
प्रभारी अधिकारी निलेश राजपूत यांना गुप्त बातमीदारामार्फत मिळालेल्या माहितीनंतर पोहेका नरेंद्र गजरे, पोना प्रदीप पाटील, पोशि समाधान तोंडे, पोशि निलेश गायकवाड, पोशि दीपक देसले व पोशि कुणाल देवरे यांच्या पथकाने सदर ठिकाणी छापा टाकला. घटनास्थळी पोलिसांची चाहूल लागताच काही जण पळण्याचा प्रयत्न करत होते, मात्र पोलिसांनी शिताफीने पाठलाग करून त्यांना पकडले.
अटक करण्यात आलेल्या संशयित आरोपींची नावे पुढीलप्रमाणे आहेत: ईश्वर सुकलाल महाजन, अक्षय राजेंद्र शिंपी , प्रविण आत्माराम पाटील , कैलास निंबा चौधरी , गणेश प्रकाश मराठे अशी आहेत. या आरोपींविरोधात कासोदा पोलीस ठाण्यात मु.जु. अधिनियम १२(अ) प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला असून, पुढील तपास पोहेका राकेश खोंडे हे करत आहेत.
ही कारवाई मा. पोलीस अधीक्षक महेश्वर रेड्डी, अपर पोलीस अधीक्षक श्रीमती कविता नेरकर, तसेच उपविभागीय अधिकारी. विनायक कोते यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली.
कासोदा पोलीस स्टेशनच्या हद्दीत कुठेही अवैध जुगार वा इतर गैरकायदेशीर कृत्ये सुरू असल्यास त्यावर कठोर कारवाई करण्यात येईल, असे पोलिसांकडून सांगण्यात आले आहे.






