ब्रेकिंग : अमळनेरला कुंटणखान्यावर छापा, ३ दलाल महिलांना अटक, ग्राहकांकडून घेत होत्या १००० रुपये

महा पोलीस न्यूज । पंकज शेटे । जळगाव जिल्ह्यातील अमळनेर येथील गांधलीपुरा येथील कुंटनखाना गेल्या काही महिन्यांपासून चर्चेत आहे. कुंटनखाण्याविषयी असलेल्या तक्रारी आणि त्यावरून सुरु असलेले राजकारण सर्वश्रुत आहे. अमळनेर पोलिसांनी मंगळवारी दुपारच्या सुमारास अचानक छापा टाकत मोठी कारवाई केली आहे. पोलिसांनी केलेल्या कारवाईत ३ दलाल महिलांना अटक करण्यात आली असून इतर महिलांची सुटका करण्यात आली आहे. पोलिसांनी कुंटनखाना सुरु असलेल्या घरातून काही ग्राहकांना देखील ताब्यात घेतले असून त्याठिकाणी ४१ निरोध मिळून आले आहे.
जळगाव जिल्ह्यात भुसावळ, अमळनेर आणि चोपडा येथील कुंटनखाना नेहमीच चर्चेत असतो. पोलिसांकडून अनेकदा कारवाई केल्यानंतर देखील त्याठिकाणी वर्षानुवर्षे देहविक्री व्यवसाय सुरूच आहे. अमळनेर येथील गांधलीपुरा तांबोळी टॉकीज जवळील कुंटणखाना काही महिन्यांपासून चांगलंच चर्चेत आहे. स्थानिक नागरिक, राजकारणी आणि वेश्या व्यवसाय करणाऱ्या हरदासी यांच्यातील वाद चांगलाच चिघळला आहे. वेश्या व्यवसाय बंद करण्यासाठी न्यायालयात आणि जिल्हा प्रशासनाकडे देखील अनेकदा तक्रार करण्यात आली आहे.
मूक मोर्चा, पोलीस ठाण्यात तक्रारी
उच्च न्यायालयाच्या दि.९ ऑक्टोबर २०२४ च्या आदेशाप्रमाणे शहरातील वेश्या व्यवसाय त्वरित बंद करण्यात यावा. या मागणीसाठी अमळनेर शहरात चार महिन्यांपूर्वी मूक मोर्चाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी संबंधित अधिकाऱ्यांविरुद्ध न्यायालयाचा आदेश अवमान याचिका दाखल करण्याचा इशाराही देण्यात आला होता. त्यानंतर देखील वेश्या व्यवसाय सुरूच राहिल्याने अनेकदा वाद देखील झाले. पोलीस ठाण्यात यावरून तक्रारी देखील दाखल करण्यात आल्या आहेत.
पोलीस निरीक्षकांची धडक कारवाई
अमळनेर पोलीस ठाण्याचा पदभार स्वीकारलेले नूतन पोलीस निरीक्षक दत्तात्रय निकम यांच्या पथकाने मंगळवारी गांधलीपुरा भागात धडक कारवाई करून छापा टाकला. पथकाने शासकीय वाहन आणि खाजगी वाहनाने जात धडक दिली. त्याठिकाणी तीन खोलीत ६ पीडित महिला आणि ८ साक्षीदार ग्राहक मिळून आले. पोलिसांनी खोलीतून ४१ निरोध हस्तगत केले आहे. दलाल महिला ग्राहकांकडून १००० रुपये घेऊन पीडित महिलांना ५०० रुपये देऊन वेश्या व्यवसाय करून घेत असल्याची माहिती समोर आली आहे.
अमळनेर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल
अमळनेर पोलीस ठाण्यात पोलीस उपनिरीक्षक नामदेव बोरकर यांच्या फिर्यादीवरून पीडित महिलांना आमिष देऊन त्यांच्याकडून वेश्या व्यवसाय करून घेत असल्याप्रकरणी जुमाबाई (पूर्ण नाव माहिती नाही), शशिकला मदन बडगुजर, मीना दीपक मिस्तरी सर्व रा.अमळनेर यांच्याविरुद्ध स्त्रिया व मुलींचे अनैतिक व्यापारास प्रतिबंधक कायद्यानुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे.