कौतुकास्पद : जैन इरिगेशनला निर्यात क्षेत्रातील आठ राष्ट्रीय सन्मान
ठिबक सिंचन, पाईप-होसेस आणि पीव्हीसी फोम शीट विभागांची उत्कृष्ट कामगिरी

महा पोलीस न्यूज । चेतन वाणी । कृषीक्षेत्रासाठी पाईप, ठिबक सिंचन प्रणाली, पीव्हीसी शीट्स व होजेस यांचे उत्पादन करणाऱ्या जैन इरिगेशन सिस्टिम्स लिमिटेड या आघाडीच्या कंपनीने पुन्हा एकदा निर्यात क्षेत्रात आपली दमदार कामगिरी सिद्ध केली आहे. प्लास्टिक एक्सपोर्ट प्रमोशन कौन्सिल (प्लेक्स कौन्सिल)तर्फे २०२३-२४ आणि २०२४-२५ या दोन वर्षांसाठी जाहीर करण्यात आलेल्या पुरस्कारांमध्ये कंपनीने तब्बल आठ पारितोषिके पटकावली.
मुंबईतील हॉटेल द लीला येथे झालेल्या या सोहळ्यात केंद्रीय वाणिज्य मंत्री पियुष गोयल यांच्या हस्ते कंपनीच्या प्रतिनिधींनी पुरस्कार स्वीकारले. कंपनीच्या वतीने उपाध्यक्ष अनिल जैन तसेच वरिष्ठ अधिकारी डॉ. अनिल पाटील, व्ही.एम. भट, डॉ. बालकृष्ण यादव, राजेंद्र महाजन, एस.एन. पाटील, के.बी. सोनार, सुचिता केरावंत, दिपा शिवदे उपस्थित होते.
दोन वर्षांत विभागनिहाय उत्कृष्टता
जैन इरिगेशनने ठिबक सिंचन, पाईप-होसेस, पीव्हीसी फोम शीट आदी विभागांमध्ये सलग उत्तम कामगिरी करत निर्यात गटात अव्वल स्थान पटकावले. २०२३-२४ मध्ये ठिबक सिंचन – प्रथम, पाईप व होसेस – प्रथम, फिटिंग्ज विभाग – द्वितीय, पीव्हीसी फोम शीट – प्रथम तसेच २०२४-२५ मध्ये : ठिबक सिंचन – प्रथम, पाईप व होसेस – द्वितीय, होसेस विभाग – द्वितीय, पीव्हीसी फोम शीट – प्रथम असे या दोन वर्षांत विविध कॅटेगरीमध्ये मिळालेले हे सलग पुरस्कार कंपनीच्या निर्यात गुणवत्तेची पुष्टी करतात.
सन्मान समारंभात मान्यवरांची उपस्थिती
प्लेक्स कौन्सिलच्या प्लॅटिनम ज्युबिली सोहळ्याच्या निमित्ताने आयोजित करण्यात आलेल्या कार्यक्रमाला ज्येष्ठ उद्योजक एम.पी. तापडिया, विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर, प्लेक्स कौन्सिलचे अध्यक्ष विक्रम बधोरिया तसेच इतर मान्यवर उपस्थित होते. दीपप्रज्वलनाने कार्यक्रमाची सुरुवात झाली. मुंबई कार्यालयातील एकनाथ महाकाळ, किसन वरे व शिवा तुपे यांनी संपूर्ण कार्यक्रमासाठी समन्वय साधला.

प्लास्टिक उद्योग शाश्वततेकडे : पियुष गोयल
केंद्रीय वाणिज्य व उद्योग मंत्री पियुष गोयल यांनी आपल्या मनोगतात भारतातील प्लास्टिक उद्योग जागतिक स्तरावर स्पर्धात्मक होत असल्याचे सांगितले. ते म्हणाले की, प्लास्टिक एक्सपोर्ट प्रमोशन कौन्सिलच्या ७० वर्षांच्या कार्यामुळे भारतीय उत्पादकांना जागतिक बाजारपेठेत स्थान मिळाले. ‘मेक इन इंडिया’ उपक्रमाच्या माध्यमातून गुणवत्तापूर्ण व शाश्वत उत्पादनांना चालना मिळत आहे. जीएसटीमुळे अंतर्गत बाजारपेठेत चैतन्य निर्माण झाले असून निर्यातक्षमता वाढली आहे.
कंपनीच्या कार्याचा गौरव : अशोक जैन
जैन इरिगेशनचे अध्यक्ष अशोक भवरलाल जैन म्हणाले, “गुणवत्ता ही बाजारातून विकत घेता येत नाही; ती कामातून निर्माण करावी लागते. आमचे सहकारी कमी संसाधनांतून शेतीत शाश्वततेकडे मार्गक्रमण करत आहेत. १९९१ पासून मिळत असलेला हा सन्मान आमच्या सर्व कर्मचाऱ्यांच्या कष्टांचे प्रतिक आहे.”






