तलवार, कुकरी घेऊन दहशत, दोघे पोलिसांच्या जाळ्यात

महा पोलीस न्यूज । दि.४ जुलै २०२५ । चाळीसगाव शहरात बेकायदेशीरपणे शस्त्र बाळगून दहशत निर्माण करणाऱ्या दोन संशयीत आरोपींना चाळीसगाव पोलिसांनी बेड्या ठोकल्या आहेत. त्यांच्याकडून धारदार तलवारीसह कुकरी जप्त करण्यात आली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, जिल्हा पोलीस अधीक्षक डॉ.महेश्वर रेड्डी, अप्पर पोलीस अधीक्षक, चाळीसगाव कविता नेरकर, उपविभागीय पोलीस अधिकारी विजय ठाकुरवाड यांच्या सूचनेनुसार पोलिसांनी ही कारवाई केली. चाळीसगाव पोलीस स्टेशनच्या हद्दीत दोन इसम बेकायदेशीर शस्त्र बाळगून दहशत निर्माण करत असल्याची गुप्त माहिती पोलिसांना मिळाली होती.
या माहितीच्या आधारे पोलिसांनी संशयित आरोपी किरण यशवंत सोनवणे, रा.उंबरखेडा, ता.चाळीसगाव आणि भिका सीताराम गायकवाड, रा.उंबरखेडा, ता.चाळीसगाव यांना ताब्यात घेतले.
दोघांच्या झडतीत धारदार लोखंडी तलवार आणि धारदार लोखंडी कुकरी अशी शस्त्रे आढळून आली. ही शस्त्रे पोलिसांनी जप्त केली आहेत. या दोन्ही आरोपींविरुद्ध मेहुणबारे पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. भारतीय हत्यार कायदा कलम 4/25, महाराष्ट्र पोलीस अधिनियम कलम 37 (1) (3) व 135 प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला असून, पुढील तपास मेहुणबारे पोलीस स्टेशन करत आहे.
संपूर्ण कारवाई मेहुणबारे पोलीस ठाण्याचे प्रभारी अधिकारी प्रवीण अ. दातारे, सहाय्यक पोलीस निरीक्षक सुहास आव्हाड, पोलीस उपनिरीक्षक विकास शिरोळे, पोलीस हेड कॉन्स्टेबल मोहन सोनवणे, कुशल शिंपी, बाबासाहेब पगारे, विनोद बेलदार, भूषण बावीस्कर, चापोइश्वर देशमुख यांच्या पथकाने केली.
चाळीसगाव आणि परिसरातील तरुणांना पोलिसांनी अशा प्रकारे परवाना नसलेली शस्त्रे बाळगू नयेत असे आवाहन केले आहे. तसेच, बेकायदेशीर शस्त्रे बाळगणाऱ्यांविषयी माहिती असल्यास मेहुणबारे पोलीस स्टेशन किंवा नियंत्रण कक्ष येथे कळवण्याचे आवाहनही पोलिसांनी केले आहे.