खिर्डी येथे रोजा इफ्तार पार्टी व ईद निमित्त मौलानांचा सत्कार

खिर्डी येथे रोजा इफ्तार पार्टी व ईद निमित्त मौलानांचा सत्कार
खिर्डी (ता. रावेर): अँटी करप्शन मानव अधिकार आंतरराष्ट्रीय फेडरेशन महाराष्ट्र राज्याच्या वतीने खिर्डी येथील मशिदीत रोजा इफ्तार पार्टीचे आयोजन करण्यात आले. या कार्यक्रमात ईद-उल-फित्र निमित्त मौलाना अबुल खैर आणि मौलाना हाफिज अहमद रजा यांचा शाल आणि बुके देऊन सत्कार करण्यात आला. हिंदू-मुस्लिम एकतेचे प्रतीक असलेल्या या कार्यक्रमाचे आयोजक व विशेष अतिथी महाराष्ट्र राज्य अध्यक्ष प्रा. संजय मोरे (अण्णा) होते.
प्रा. संजय मोरे यांनी आपल्या मनोगतात इस्लाम धर्म आणि रमजानचे महत्त्व विशद केले. त्यांनी सांगितले की, पैगंबर मुहम्मद (सलअम) यांचा जन्म २० एप्रिल ५७१ रोजी मक्केत झाला. ते अल्लाहचे अंतिम प्रेषित मानले जातात आणि त्यांच्यामार्फत कुराण हा पवित्र ग्रंथ लोकांपर्यंत पोहोचला. रमजानची सुरुवात इ.स. ६२४ मध्ये झाली आणि तेव्हापासून ही परंपरा चालत आहे. रमजान हा इस्लामच्या पाच मूलभूत तत्त्वांपैकी एक असून, यात तोंहीद (अल्लाहवर विश्वास), नमाज (दिवसातून पाच वेळा प्रार्थना), जकात (दान), रोजा (उपवास) आणि हज (मक्केची तीर्थयात्रा) यांचा समावेश होतो. रमजान हा केवळ उपवासाचा महिना नसून, आत्मसंयम, अध्यात्मिक सुधारणा आणि दानधर्माचा काळ आहे. या काळात कुराण पठण आणि प्रार्थनेला विशेष महत्त्व आहे. रमजानच्या समाप्तीनंतर ईद-उल-फित्र साजरी केली जाते, जी बंधुभाव आणि शांतीचे प्रतीक आहे.
प्रा. मोरे यांनी पुढे नमूद केले की, रोजा इफ्तार पार्टी हे विश्वशांती, समता, बंधुत्व आणि एकमेकांबद्दल प्रेम व आपुलकीचे प्रतीक आहे. या कार्यक्रमाला मौलाना अबुल खैर, मौलाना हाफिज अहमद रजा, मुतबल असलम, शेख नईम, मौलाना दिपक पाटील, पंचायत समिती सदस्य उपप्राचार्य विवेक बोडे, पोलीस पाटील रितेश चौधरी, रफिक बेग, शेख जाबीर बेग, इंद्रिस शेख, सादिक पिंजारी, सलमान फैयाज बेग, शेख इम्रान, शेख नाजीर यांच्यासह अनेक हिंदू-मुस्लिम बांधव आणि लहान मुले उपस्थित होती.
या आयोजनाने खिर्डी गावात सामाजिक सलोखा आणि एकतेचा संदेश प्रभावीपणे पोहोचवला, तसेच ईद निमित्त मौलानांचा सत्कार करून धार्मिक सौहार्दाचे दर्शन घडवले.