घरफोडीच्या तयारीत असलेली सिकलीकर टोळी निजामपुर पोलिसांच्या जाळ्यात!
मध्यरात्री सापळा रचून तिघांना अटक; घरफोडीची साधने जप्त

घरफोडीच्या तयारीत असलेली सिकलीकर टोळी निजामपुर पोलिसांच्या जाळ्यात!
मध्यरात्री सापळा रचून तिघांना अटक; घरफोडीची साधने जप्त
निजामपुर प्रतिनिधी धुळे जिल्ह्यातील निजामपुर पोलिसांनी दिवाळीपूर्वी मोठी कारवाई करत सराईत सिकलीकर घरफोड्या टोळीला गजाआड केले आहे. छडवेल-कोर्डे गाव शिवारात मध्यरात्रीच्या सुमारास संशयास्पद हालचालींची माहिती मिळाल्यानंतर पोलिसांनी सापळा रचत तीन संशयितांना ताब्यात घेऊन घरफोडीचे साहित्य जप्त केले आहे.
हि कारवाई १८ ऑक्टोबर २०२५ रोजी रात्री प्रभारी अधिकारी मा. मयुर भामरे (सहाय्यक पोलीस निरीक्षक) यांच्या नेतृत्वाखाली करण्यात आली. गुप्त बातमीदाराने दिलेल्या खात्रीशीर माहितीनुसार छडवेल कोर्डे परिसरात पोलिसांनी रात्रगस्त वाढवून शोधमोहीम सुरू केली. रात्री सुमारे १२.३० वाजता दहिवेल-नंदुरबार रस्त्यावर तीन संशयित इसम आढळले, त्यांची झडती घेतली असता दोन स्क्रू ड्रायव्हर, लोखंडी टामी, अॅडजेस्टेबल पाना आणि मोसा असे घरफोडीसाठी उपयोगी साहित्य पोलिसांना मिळाले.
या आरोपींमध्ये नगरसिंग ऊर्फ नगसिंग ओंकारसिंग सिकलीकर , पर्वतसिंग दिलीपसिंग सिकलीकर, गुरुपाल कप्तान सिकलीकर (सर्व रा. एकतानगर, नळवा रोड, नंदुरबार) यांचा समावेश असून
चौकशीतून या तिघांचा नंदुरबार, संभाजीनगर व बीड येथील विविध घरफोडी आणि शस्त्रसंबंधी गुन्ह्यांशी संबंध असल्याचे निष्पन्न झाले आहे. त्यामुळे त्यांच्यावर निजामपुर पोलीस स्टेशन गु.र.न. २७२/२०२५, म.पो.का. कलम १२२ नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
प्रभारी अधिकारी मयुर भामरे यांनी आवाहन केले आहे की, दिवाळी सणाच्या पार्श्वभूमीवर नागरिकांनी कोणताही अनोळखी किंवा संशयास्पद इसम परिसरात दिसल्यास त्वरित निजामपुर पोलिसांशी संपर्क साधावा.
हि कारवाई पोलीस अधीक्षक श्रीकांत धिवरे, अपर पोलीस अधीक्षक अजय देवरे, आणि उपविभागीय अधिकारी एस. आर. बांबळे (साक्री) यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली. या यशस्वी ऑपरेशनमध्ये सपोनि. प्रियदर्शनी थोरात, पोसई. मधुकर सोमासे, पोउपनि. वाय. आर. भामरे, तसेच प्रदीपकुमार आखाडे, नारायण माळचे, रतन मोरे, अर्जुन पवार, गौतम अहिरे, परमेेश्वर चव्हाण, श्रीराम पदमर, सुनिल अहिरे, टिलु पावरा, मोहन माळी यांचा सक्रिय सहभाग होता.






