अत्याचारातून अल्पवयीन मुलीने दिला बाळाला जन्म

अत्याचारातून अल्पवयीन मुलीने दिला बाळाला जन्म
बळजबरीने लावलेल्या बालविवाहाचा पर्दाफाश, पाच जणांवर गुन्हा
जळगाव प्रतिनिधी चोपडा तालुक्यातील एका गावात राहणाऱ्या १५ वर्षीय अल्पवयीन मुलीवर लैंगिक अत्याचार करून तिचा बळजबरीने बालविवाह लावण्यात आला आणि त्या अत्याचारातून तिने नुकतेच बाळाला जन्म दिल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. या प्रकरणी अडावद पोलीस स्टेशनमध्ये पाच जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, १५ वर्षे ११ महिन्यांची ही मुलगी चोपड्यातील एका खाजगी रुग्णालयात प्रसूतीसाठी दाखल झाली होती. प्रसूतीदरम्यान तिने बाळाला जन्म दिला; मात्र मुलीचे कमी वय पाहून हॉस्पिटलमधील डॉक्टरांना संशय आला. त्यांनी तातडीने ही बाब अडावद पोलिसांना कळवली.
पोलिसांनी केलेल्या तपासात ही मुलगी अल्पवयीन असल्याचे स्पष्ट झाले. याचदरम्यान उघड झाले की, वर्षभरापूर्वी तिचा बळजबरीने विवाह आरोपी तरुणाशी लावण्यात आला होता. विवाहानंतर आरोपीने तिच्यावर वेळोवेळी अत्याचार करून तिच्याशी जबरदस्तीने शारीरिक संबंध ठेवले होते. या अत्याचारातून ती गर्भवती राहिली आणि नंतर प्रसूतीसाठी तिला रुग्णालयात आणण्यात आले.
आरोपी याच्यासह मुलीचे आई-वडील, तरोच सासू-सासरे आणि एका नातेवाईकाविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तपास सपोनी प्रमोद वाघ करीत आहेत.






