जळगाव बायपासचे वाळूमाफियांकडून लोकार्पण, तालुका-नशिराबाद पोलिसांची चांदीच चांदी!

महा पोलीस न्यूज । चेतन वाणी । जळगाव शहरातून जाणारा महामार्ग शहराच्या बाहेरून वळविण्यात आला असून पाळधी ते तरसोद नवीन महामार्ग तयार करण्यात आला आहे. दोन वेळा मुदतवाढ दिल्यानंतर देखील महामार्ग अद्याप जनतेसाठी जाहीररीत्या खुला झाला नसला तरी त्याचे अनधिकृतपणे वाळूमाफियांनी लोकार्पण केले आहे. नवीन बायपासमुळे शहरातून बाहेर तालुक्यात होणारी वाळू वाहतूक टळली आहे. त्यामुळेच तालुका आणि नशिराबाद पोलिसांची चांगलीच चांदी होत आहे.
जळगाव शहर आणि जिल्हा तसे अवैध वाळू वाहतूक आणि वाळू चोरीमुळे नेहमीच चर्चेत असतो. बाराही महिने वाळू चोरी जळगाव तालुक्यातच नव्हे तर एरंडोल, चाळीसगाव, पाचोरा, जामनेर, भुसावळ, रावेर, यावल, चोपडा परिसरात सुरु असते. अनेकदा महसूल अधिकाऱ्यांवर देखील वाळूमाफियांनी हल्ला केल्याच्या घटना घडल्या आहेत तर वाळूच्या वाहनांमुळे अपघात देखील झाले आहेत.
जळगाव शहरातून जाणाऱ्या महामार्गाची दुरवस्था झाली असून ठिकठिकाणी खड्डे पडले आहे. शहरातून जाणाऱ्या महामार्गाची ओळख सध्या मृत्यूचा महामार्ग म्हणून झाली आहे. नेहमीच त्याठिकाणी अपघात होतात आणि कुणाचा ना कुणाचा बळी जात असतो. शहरातून जाणारा महामार्ग पाळधी येथून तरसोदपर्यंत बायपास करण्यात आला असून गेल्या दोन वर्षांपासून त्याचे काम सुरु आहे. दोन वेळा मुदतवाढ दिली तरी त्याचे काम पूर्ण झालेले नाही.
वाळूमाफियांनीच केले लोकार्पण
बायपास महामार्गाचे काम लवकरात लवकर होण्यासाठी पालकमंत्री गुलाबराव पाटील, खा.स्मिता वाघ, जिल्हाधिकारी आयुष प्रसाद यांनी अनेकदा पाहणी करून आवश्यक त्या सूचना केल्या. मक्तेदाराने आपल्या कामाची पर्याप्त गती न ठेवल्याने आजही काम १०० टक्के पूर्ण होऊ शकलेले नाही. एक बाजूचा मार्ग वापरास सुरु झाला असला तरी काही चाचणी आणि तपासणी केल्यानंतर त्याचे लोकार्पण केले जाणार आहे. दरम्यान, जळगाव तालुक्यातील वाळूमाफियांनी अगोदरच त्या महामार्गावरून सुसाट वाळू वाहतूक सुरु केली असून अनधिकृतपणे लोकार्पण केले आहे.
तालुका – नशिराबाद पोलिसांची चांदीच चांदी
जळगाव शहरातून नेहमीच वाळू वाहतूक होत असते. शहरातून शहराच्या बाहेर वाळू वाहतूक करताना तालुका, शहर, शनिपेठ, जिल्हापेठ, रामानंद नगर, एमआयडीसी पोलीस ठाण्याच्या हद्दीतून नशिराबादमार्गे भुसावळ शहराकडे जावे लागते. अवैध वाळू वाहतूक केली जात असल्याने सर्वच पोलीस ठाण्यात हजेरी ठरलेली असते. नवीन बायपास महामार्गामुळे तालुका पोलीस ठाण्याच्या हद्दीतून वाळू चोरी केल्यानंतर थेट नशिराबाद येथे पोहचता येत असल्याने इतर पोलीस ठाण्यांचा पत्ताच कट झाला आहे. सध्या तरी नवीन बायपास तालुका आणि नशिराबाद पोलिसांच्या चांगल्याच पथ्थ्यावर पडला असल्याचे दिसत आहे.






