चाळीसगाव तालुक्यात सरपंच पदासाठी अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती, नागरिकांचा मागास प्रवर्ग व सर्वसाधारण गटासाठी आरक्षण प्रक्रिया पार

चाळीसगाव तालुक्यात सरपंच पदासाठी अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती, नागरिकांचा मागास प्रवर्ग व सर्वसाधारण गटासाठी आरक्षण प्रक्रिया पार
चाळीसगाव : ग्रामविकास विभाग, महाराष्ट्र शासनाच्या आदेशानुसार चाळीसगाव तालुक्यातील ११० ग्रामपंचायतींमधील सरपंच पदांसाठी अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती, नागरिकांचा मागास प्रवर्ग व सर्वसाधारण गटासाठी आरक्षण प्रक्रिया मंगळवारी (दि. ८ जुलै) पार पडली. शासनाच्या १३ जून २०२५ रोजीच्या आदेशानुसार ५ मार्च २०२५ रोजीची अधिसूचना अधिक्रमित करत नव्याने आरक्षण सोडत काढण्याचे निर्देश देण्यात आले होते.
ही प्रक्रिया सकाळी ११ वाजता चाळीसगाव येथील प्रशासकीय इमारतीत तहसीलदार श्री. प्रशांत पाटील यांच्या अध्यक्षतेखाली पार पडली.
त्यानंतर दुपारी २ वाजता उपविभागीय अधिकारी श्री. प्रमोद हिले यांच्या अध्यक्षतेखाली सरपंच पदांपैकी ५०% महिला आरक्षणासाठी स्वतंत्र सोडत काढण्यात आली.
विशेष बाब म्हणजे, चिठ्ठी टाकून आरक्षण निश्चित करण्याची प्रक्रिया कु. अभिज्ञा वीरेंद्र पाटील (वय ६ वर्ष) यांच्या हस्ते पार पडली, यामुळे उपस्थितांमध्ये विशेष आकर्षण निर्माण झाले.
या प्रक्रियेसाठी चाळीसगाव तालुक्यातील विविध ग्रामपंचायतीचे सरपंच, उपसरपंच, सदस्य, ग्रामस्थ तसेच पत्रकार बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते.
आरक्षण सोडतीचे संपूर्ण कामकाज निवासी नायब तहसीलदार श्री. प्रथमेश मोहोड यांच्या मार्गदर्शनाखाली महसूल सहाय्यक श्री. नितीन ढोकणे व श्री. रवी बोरसे यांनी सुरळीत पार पाडले. याशिवाय डॉ. संदेश निकुंभ (नायब तहसीलदार, महसूल) आणि श्री. बी. आर. शिंदे (नायब तहसीलदार, संजय गांधी योजना) यांनी सहकार्य केले.
ही प्रक्रिया पारदर्शक व शांततेत पार पडल्याने ग्रामस्थांनी समाधान व्यक्त केले आहे.