अवकाळी पावसामुळे मोठ्या प्रमाणात नुकसान ; आ. अनिल पाटील यांची तात्काळ मदतीची मागणी

अवकाळी पावसामुळे मोठ्या प्रमाणात नुकसान ; आ. अनिल पाटील यांची तात्काळ मदतीची मागणी
अमळनेर (प्रतिनिधी) : उत्तर महाराष्ट्रासह अमळनेर विधानसभा मतदारसंघात गेल्या काही दिवसांपासून सुरू असलेल्या अवकाळी व मुसळधार पावसामुळे शेतीपिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. या पार्श्वभूमीवर मदत व पुनर्वसन विभागाचे मंत्री मा. ना. मकरंद पाटील यांना अमळनेरचे आमदार आणि राज्याचे माजी आपत्ती व्यवस्थापन, मदत व पुनर्वसन मंत्री अनिल भाईदास पाटील यांनी राज्याचे सध्याचे मदत व पुनर्वसन मंत्री मकरंद पाटील यांना निवेदन देऊ तात्काळ पंचनामे करण्याची आणि शेतकऱ्यांना तत्काळ आर्थिक मदत देण्याची मागणी केली आहे.
निवेदनात म्हटले आहे की, खरीप हंगामाच्या सुरूवातीला पावसाने दडी मारली होती, त्यानंतर झालेल्या अतिवृष्टीमुळे बळीराजाचा हंगाम हातातून गेला. त्यातच आता झालेल्या अवकाळी पावसामुळे हाता-तोंडाशी आलेला घासही हिरावला गेला आहे.
मतदारसंघातील एकूण ८१,२१२ हेक्टर लागवडीखालील क्षेत्रापैकी ४६,९४८ हेक्टरवरील कपाशी, तसेच २९,४१२ हेक्टरवरील मका, ३,५४४ हेक्टरवरील ज्वारी, ७४७ हेक्टरवरील बाजरी, आणि २०० हेक्टरवरील सोयाबीन पिकांचे अतोनात नुकसान झाले आहे. शासनाच्या विद्यमान निकषांनुसार फक्त उभ्या पिकाचाच पंचनामा केला जातो; मात्र अनेक शेतकऱ्यांच्या शेतात काढणी झालेली पिकेच नष्ट झाली आहेत.
या पार्श्वभूमीवर निवेदनात कापणी झालेल्या मका, ज्वारी, बाजरी आणि सोयाबीन पिकांचे विशेष बाब म्हणून पंचनामे करण्याचे आदेश देऊन सरसकट मदत देण्यात यावी, अशी मागणी करण्यात आली आहे.
शेतकऱ्यांवरील आर्थिक संकट लक्षात घेऊन तात्काळ मदतीसाठी उपाययोजना करण्यात याव्यात, अशीही अपेक्षा निवेदनातआमदार अनिल पाटील यांनी व्यक्त केली आहे.






