
वाढत्या प्राणांतिक अपघातांवर पोलिसांची धडक मोहीम; जिल्हास्तरीय आढावा बैठक
ट्रक चालकांपासून ढाबा चालकांपर्यंत जनजागृती; दारू पिऊन वाहन चालवणाऱ्यांवर कठोर कारवाईचे निर्देश
जळगाव : जिल्ह्यात वाढत्या प्राणांतिक अपघातांच्या पार्श्वभूमीवर गुरुवारी सकाळी जिल्हा पोलिस प्रशासनाची महत्त्वपूर्ण व्हीसी बैठक पार पडली. या बैठकीत दोन्ही अतिरिक्त पोलिस अधीक्षक, सर्व उपविभागीय पोलिस अधिकारी (एसडीपीओ), पोलिस स्टेशन प्रभारी अधिकारी, वाहतूक शाखेचे अधिकारी तसेच हायवे स्टेट पॅट्रोल (एचएसपी) विभागाचे अधिकारी व अंमलदार सहभागी झाले होते.
बैठकीत अपघात रोखण्यासाठी विविध ठोस उपाययोजनांवर चर्चा करण्यात आली. विशेषतः एमआयडीसी परिसरातील ट्रक चालकांसाठी कार्यशाळा आयोजित करणे, गावांमधील ट्रॅक्टर चालकांना प्रशिक्षण देणे तसेच ढाबे आणि हॉटेल चालकांना अपघातानंतर तातडीची मदत, सीपीआर आणि प्राथमिक उपचारांचे प्रशिक्षण देण्याचा निर्णय घेण्यात आला.
याशिवाय, राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण (NHAI) आणि सार्वजनिक बांधकाम विभागाकडे (PWD) पाठवण्यात आलेल्या रस्त्यांच्या संरचनात्मक बदलांच्या प्रस्तावांचा पाठपुरावा करण्याच्या सूचना देण्यात आल्या. लग्नसराईच्या काळात प्रवासी टेम्पोमध्ये होणारी अतिगर्दी रोखण्यासाठी विशेष कारवाई केली जाणार असून, प्रत्येक पोलिस स्टेशनच्या वाहनांमध्ये अपघातासाठी आवश्यक फर्स्ट एड बॉक्स ठेवण्याचे निर्देशही देण्यात आले.
हायवेवर रस्त्याच्या कडेला उभ्या राहणाऱ्या ट्रकांवर कारवाई, दारू पिऊन वाहन चालवणाऱ्यांविरोधात कठोर मोहीम तसेच अवैध प्रवासी वाहतुकीवर नियंत्रण ठेवण्यावर बैठकीत भर देण्यात आला.
बैठकीत एक महत्त्वाची बाब समोर आली असून, जिल्ह्यातील सुमारे ७५ टक्के अपघातग्रस्तांना नॉन-अॅम्बुलन्स वाहनांतून हलवण्यात येत असल्याचे निदर्शनास आले. त्यामुळे अपघातस्थळी तातडीने रुग्णवाहिका उपलब्ध करून देण्यासाठी स्वतंत्र नियोजन करण्याचे निर्देश देण्यात आले.
ज्या भागांत रस्त्यांची कामे सुरू आहेत, त्या ठिकाणच्या डंपर चालकांना विशेष सूचना देण्याबरोबरच जनजागृती मोहीम राबवण्यावर भर देण्यात आला. तसेच प्रत्येक पोलिस स्टेशनने आपल्या हद्दीतील प्राणांतिक अपघातांचे ठिकाण, वेळा, अपघातातील वाहने आणि कारणांचा अभ्यास करून त्यानुसार उपाययोजना व कारवाई करावी, असे आदेश बैठकीत देण्यात आले.





