बसमधून २५ लाखांची रोकड लंपास; एलसीबीच्या सापळ्यात चौघे जेरबंद

बसमधून २५ लाखांची रोकड लंपास; एलसीबीच्या सापळ्यात चौघे जेरबंद
गोपनीय माहितीच्या आधारे गाजलेल्या चोरीचा छडा; संपूर्ण रोकडसह ३० लाखांचा मुद्देमाल हस्तगत
जळगाव | प्रतिनिधी
लक्झरी बसमधून व्यापाऱ्याच्या २५ लाख रुपयांच्या रोकड असलेल्या बॅगेची चोरी करणाऱ्या चौघांना स्थानिक गुन्हे शाखेने अवघ्या काही दिवसांत जेरबंद करत गाजलेल्या गुन्ह्याचा छडा लावला आहे. या कारवाईत चोरीस गेलेली २५ लाख रुपयांची रोकड आणि गुन्ह्यात वापरण्यात आलेली सुमारे ५ लाख रुपयांची मारुती डिझायर कार असा एकूण ३० लाख रुपयांचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला आहे.
जेवणासाठी उतरले अन् बॅग झाली गायब
११ जुलै २०२६ रोजी नितीन पुरुषोत्तम वाणी (रा. पारोळा) हे सराफ व्यावसायिक प्रफुल्ल भागचंद सुराणा यांच्या वतीने कोल्हापूर येथे चांदी खरेदीसाठी २५ लाख रुपयांची रोकड घेऊन लक्झरी बसने प्रवास करत होते. रात्री फर्दापूर (जि. छत्रपती संभाजीनगर) येथे बस जेवणासाठी थांबली असता ते खाली उतरले. परत आल्यानंतर बसमध्ये ठेवलेली रोकड असलेली बॅग चोरीला गेल्याचे निदर्शनास आले. याप्रकरणी एमआयडीसी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला.
गोपनीय माहितीवरून उलगडा
पोलीस अधीक्षक श्रीकांत धिवरे, अपर पोलीस अधीक्षक संदीप गावीत आणि उपविभागीय पोलीस अधिकारी नितीन गणापुरे यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेने तपास सुरू केला. वरिष्ठ पोलीस निरीक्षक राहुल गायकवाड यांना मिळालेल्या गोपनीय माहितीच्या आधारे पथकाने सोनू उर्फ राम भगवान सारवाण (रा. गुरुनानक नगर, शनिपेठ), शेख रहेमान शेख निसार (रा. पिंप्राळा हुडको), सचिन उर्फ मंगेश सूर्यकांत झांबरे (रा. कोल्हे नगर) आणि दशरथ सुरेश चौधरी (रा. खंडेराव नगर, पिंप्राळा) या चौघांना ताब्यात घेतले. चौकशीत गुन्ह्याची माहिती समोर आल्यानंतर पुढील कारवाई करण्यात आली.
३० लाखांचा मुद्देमाल हस्तगत
या कारवाईत चोरीस गेलेली २५ लाख रुपयांची रोकड जप्त करण्यात आली. तसेच गुन्ह्यात वापरण्यात आलेली एमएच-४७-सी-७८७७ क्रमांकाची मारुती डिझायर कारही जप्त करण्यात आली. एकूण ३० लाख रुपयांचा मुद्देमाल पोलिसांनी हस्तगत केला आहे.
पुढील तपास एमआयडीसी पोलिसांकडे
पुढील कायदेशीर कारवाईसाठी चौघांना एमआयडीसी पोलीस ठाण्याच्या ताब्यात देण्यात आले असून या गुन्ह्याचा पुढील तपास एमआयडीसी पोलीस करीत आहेत.
कारवाई करणारे पथक
ही कारवाई पोलीस अधीक्षक श्रीकांत धिवरे, अपर पोलीस अधीक्षक संदीप गावीत आणि उपविभागीय पोलीस अधिकारी नितीन गणापुरे यांच्या मार्गदर्शनाखाली वरिष्ठ पोलीस निरीक्षक राहुल गायकवाड यांच्या नेतृत्वाखाली पोलीस उपनिरीक्षक दीपक जगदाळे, संतोष पवार, सहायक फौजदार अतुल वंजारी, पोलीस हेड कॉन्स्टेबल अक्रम शेख, विजय पाटील, मुरलीधर धनगर, प्रवीण भालेराव, किशोर पाटील, राहुल रगडे, प्रदीप सपकाळे, रवींद्र कापडणे, छगन तायडे, तांत्रिक विश्लेषण विभागातील गौरव पाटील, मिलिंद जाधव तसेच नेत्रम विभागातील मुबारक देशमुख, पंकज खडसे आणि कुदनसिंग व्यास यांनी केली.





