Crime

जबरी चोरी करणारी सराईत टोळी जेरबंद; १० गुन्हे उघडकीस, ११.१९ लाखांचा मुद्देमाल जप्त

जबरी चोरी करणारी सराईत टोळी जेरबंद; १० गुन्हे उघडकीस, ११.१९ लाखांचा मुद्देमाल जप्त

अहिल्यानगर स्थानिक गुन्हे शाखेची मोठी कामगिरी

अहिल्यानगर : जिल्ह्यात जबरी चोरीच्या घटना घडवणाऱ्या सराईत आरोपींच्या टोळीला स्थानिक गुन्हे शाखेने जेरबंद करत तब्बल १० गुन्हे उघडकीस आणले आहेत. आरोपींकडून ११ लाख १९ हजार ८०० रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला असून या कारवाईमुळे जिल्ह्यातील चोरीच्या घटनांचा उलगडा झाला आहे.

अहिल्यानगर तालुका पोलीस ठाण्यात गुन्हा रजिस्टर क्रमांक ३१७/२०२६ अन्वये भारतीय न्याय संहिता कलम ३०९ (६) प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला होता. या प्रकरणात फिर्यादी ताराबाई मुरलीधर कोकाटे या शेतात काम करत असताना अज्ञात चोरट्यांनी त्यांच्या गळ्यातील ७८ हजार रुपये किंमतीचे सोन्याचे दागिने जबरदस्तीने चोरून नेले होते.

या गुन्ह्याचा तपास सुरू असताना स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने घटनास्थळी भेट देऊन तांत्रिक व गोपनीय माहितीच्या आधारे तपास सुरू केला. तपासादरम्यान हा गुन्हा रेकॉर्डवरील आरोपी गणेश दिवानजी काळे (रा. वाकोडी, ता. जि. अहिल्यानगर) याने साथीदारांसह केल्याची माहिती मिळाली. आरोपी हे वाकोडी गावाजवळील जुना जकात नाका परिसरात दोन मोटारसायकलींसह येणार असल्याची माहिती पोलिसांना मिळाली.
त्यानुसार पथकाने सापळा रचला असता संशयित आरोपी पोलिसांना पाहून पळून जाण्याचा प्रयत्न करू लागले. मात्र पाठलाग करून पोलिसांनी त्यांना ताब्यात घेतले. चौकशीत आरोपींची नावे गणेश दिवानजी काळे (वय २८), विनय उर्फ टकल्या योगेश काळे (वय १९, रा. वाळंज) आणि रोहित लल्या भोसले (वय २३, रा. सराटी वडगाव, ता. आष्टी, जि. बीड) अशी असल्याचे निष्पन्न झाले.

मुख्य आरोपी गणेश काळे याच्याकडे सखोल चौकशी केली असता त्याने साथीदारांसह अनेक जबरी चोरीचे गुन्हे केल्याची कबुली दिली. पोलिसांनी आरोपींकडून ९ लाख ४ हजार ८०० रुपये किंमतीचे १०२ ग्रॅम सोन्याचे दागिने, ४५ हजार रुपये किंमतीचे तीन मोबाईल फोन तसेच १ लाख ७० हजार रुपये किंमतीच्या दोन मोटारसायकली असा एकूण ११ लाख १९ हजार ८०० रुपयांचा मुद्देमाल जप्त केला.

तपासादरम्यान आरोपींकडून अहिल्यानगर जिल्ह्यातील विविध पोलीस ठाण्यांतील १० गुन्हे उघडकीस आले आहेत. यामध्ये अहिल्यानगर तालुका, श्रीगोंदा, सुपा, बेलवंडी, तोफखाना आदी पोलीस ठाण्यांच्या हद्दीतील जबरी चोरी आणि घरफोडीच्या गुन्ह्यांचा समावेश आहे.

मुख्य आरोपी गणेश काळे याच्याविरुद्ध यापूर्वीही अहिल्यानगर व बीड जिल्ह्यांत घरफोडी, चोरी, मारहाण आणि जबरी चोरीचे अनेक गुन्हे दाखल असल्याचे पोलिस तपासात समोर आले आहे. तसेच आरोपी रोहित भोसले याच्याविरुद्धही पाथर्डी पोलीस ठाण्यात गंभीर गुन्ह्यांची नोंद आहे.
अटक करण्यात आलेल्या तिन्ही आरोपींना पुढील तपासासाठी अहिल्यानगर तालुका पोलीस ठाण्याच्या ताब्यात देण्यात आले असून पुढील तपास सुरू आहे.

Chetan Wani

पत्रकारिता क्षेत्रात गत १६ वर्षांपासून कार्यरत. शोध पत्रकारिता, क्राईम रिपोर्टींगचा १५ वर्षांचा प्रदीर्घ अनुभव. राजकारण, प्रशासन, क्रीडा, संस्कृती, उद्योग जगतातील विशेष लेखन. विविध दैनिक, मंत्रालय, माहिती व जनसंपर्क विभागातील पत्रकारितेचा अनुभव. लोकसभा, विधानसभा, मनपा निवडणूक काळात मीडिया मॅनेजमेंट. सोशल मीडिया मॅनेजमेंट, इमेज बिल्डिंग, मार्केटिंग, ब्रॅण्डिंग यासारख्या विविध क्षेत्राचा प्रदीर्घ अनुभव. संपर्क : 9823333119

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button