
१६० कोटींच्या शालार्थ घोटाळ्यात मोठी कारवाई; माजी शिक्षणाधिकाऱ्याला धुळ्यातून अटक
जळगावातील २५९ शिक्षक-शिक्षकेतर कर्मचाऱ्यांना कथित बनावट वैयक्तिक मान्यता
८४१ प्रकरणांच्या तपासात १२०० हून अधिक जण तपासाच्या कक्षेत
जळगाव | नाशिक I प्रतिनिधी
राज्यात गाजत असलेल्या १६० कोटी रुपयांच्या कथित शालार्थ घोटाळ्याच्या तपासात आणखी एक महत्त्वाची कारवाई करण्यात आली आहे. जळगाव जिल्हा परिषदेचे माजी माध्यमिक शिक्षणाधिकारी शशिकांत भाऊराव हिंगोणेकर यांना नाशिकरोड पोलिसांनी धुळे येथून ताब्यात घेतले. या कारवाईमुळे शिक्षण विभागात मोठी खळबळ उडाली असून तपास अधिक वेगाने सुरू आहे.
२५९ शिक्षकांना बनावट मान्यता
तपासात समोर आलेल्या माहितीनुसार, सन २०११ ते २०१५ या कालावधीत जळगाव जिल्ह्यातील २५९ शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांच्या वैयक्तिक मान्यतेसाठी कोणतेही अधिकृत प्रस्ताव शिक्षणाधिकारी कार्यालयात प्राप्त झाले नव्हते. असे असतानाही संबंधितांना वैयक्तिक मान्यता देण्यात आल्याचे तपासात निष्पन्न झाल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे.
धुळ्यातून केली अटक
गोपनीय माहिती व तांत्रिक विश्लेषणाच्या आधारे हिंगोणेकर धुळे येथे असल्याचे निष्पन्न झाल्यानंतर सहाय्यक पोलीस आयुक्त संदीप मिटके यांच्या मार्गदर्शनाखाली विशेष पथकाने धुळे येथे शोधमोहीम राबवली. सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक मनोहर शिंदे, नंदकुमार नांदुळीकर, पोलीस हवालदार चंद्रकांत गवळी तसेच पोलीस अंमलदार तेजस मते व सुनील खैरणार यांनी कारवाई करून त्यांना ताब्यात घेतले. त्यानंतर त्यांना नाशिकरोड पोलीस ठाण्यात आणण्यात आले.
८४१ मान्यता आणि १६० कोटींचा संशयित घोटाळा
नाशिक विभागातील नाशिक, जळगाव, धुळे व नंदुरबार जिल्ह्यांतील एकूण ८४१ शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांच्या वैयक्तिक मान्यता आणि शालार्थ प्रस्तावांमध्ये गंभीर अनियमितता झाल्याचा तपासात संशय व्यक्त करण्यात आला आहे. मागील तारखांच्या नियुक्त्या दाखवून बनावट शालार्थ आदेशांच्या आधारे वेतन व थकबाकी उचलण्यात आल्याने शासनाची सुमारे १६० कोटी रुपयांची आर्थिक फसवणूक झाल्याचा आरोप या गुन्ह्यात आहे.
तपासाची व्याप्ती वाढली
या प्रकरणात मुख्याध्यापक, संस्थाचालक, तत्कालीन शिक्षण उपसंचालक, शिक्षणाधिकारी, वेतन अधीक्षक तसेच इतर संबंधितांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असून, तपासादरम्यान आतापर्यंत १२०० हून अधिक जणांचा सहभाग तपासाच्या कक्षेत आल्याची माहिती तपास यंत्रणेकडून देण्यात आली आहे. या बहुचर्चित प्रकरणात पुढील काळात आणखी कारवाई होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.






