मोबाईल हिसकावून पळणाऱ्या दोघांना वाहतूक पोलिसांनी पकडले
आकाशवाणी चौकातील दत्त मंदिराजवळ कारवाई; दुचाकीसह दोघे संशयित पोलिसांच्या ताब्यात


मोबाईल हिसकावून पळणाऱ्या दोघांना वाहतूक पोलिसांनी पकडले
आकाशवाणी चौकातील दत्त मंदिराजवळ कारवाई; दुचाकीसह दोघे संशयित पोलिसांच्या ताब्यात
जळगाव (प्रतिनिधी) – मोबाईल हिसकावून दुचाकीवरून पळून जाण्याचा प्रयत्न करणाऱ्या दोघांना वाहतूक पोलिसांनी प्रसंगावधान राखत वेळीच अडवून पकडले. आकाशवाणी चौकातील दत्त मंदिराजवळ ही कारवाई करण्यात आली. पोलिसांनी दोघांकडील मोटारसायकल ताब्यात घेतली असून, हिसकावून घेतलेला मोबाईल संबंधित व्यक्तीला परत करण्यात आला.
वाहतूक पॉईंटवर कर्तव्य बजावत असताना निदर्शनास आली घटना
एएसआय दीपक बनसोडे आणि पोलीस कॉन्स्टेबल भूषण मोरे हे आकाशवाणी चौक येथे वाहतूक पॉईंट ड्युटीवर होते. याचदरम्यान दत्त मंदिराच्या बाजूने एक व्यक्ती जात असताना दोघांनी त्याला अडवले. त्याच्याकडील मोबाईल हिसकावून घेतल्यानंतर दोघांनी मोटारसायकलवरून तेथून पळून जाण्याचा प्रयत्न केला. मात्र, कर्तव्यावर असलेल्या पोलिसांच्या ही बाब लक्षात येताच त्यांनी तत्काळ दोघांना अडवून ताब्यात घेतले.
पोलिसांनी दोघांकडून मोटारसायकल क्रमांक एमएच 19 ईटी 8367 ताब्यात घेतली. तसेच त्यांच्या ताब्यात असलेला मोबाईल संबंधित व्यक्तीला परत करण्यात आला. घटनेची माहिती तातडीने पोलीस नियंत्रण कक्षाला वायरलेसद्वारे देण्यात आली.
दोघे जिल्हापेठ पोलिसांच्या ताब्यात
संशयित अमोल एकनाथ बोदडे (वय 30, रा. रामनगर, महाबळ, जळगाव) आणि तौसिफ बेग खलील बेग (वय 32, रा. समतानगर, जळगाव) यांना पुढील कायदेशीर कारवाईसाठी मोटारसायकलसह जिल्हापेठ पोलीस ठाण्याच्या ताब्यात देण्यात आले.
वाहतूक पोलिसांच्या सतर्कतेचे कौतुक
मोबाईल हिसकावून पळून जाण्याचा प्रयत्न करणाऱ्या दोघांना वाहतूक पोलिसांनी वेळीच रोखल्याने त्यांचा प्रयत्न फसला. कर्तव्यावर असताना प्रसंगावधान राखून केलेल्या या कारवाईबद्दल एएसआय दीपक बनसोडे आणि पोलीस कॉन्स्टेबल भूषण मोरे यांच्या सतर्कतेचे कौतुक होत आहे.







