CrimeDetection

पान-सिगारेटच्या उधारीवरून कोयता अन् तलवारीने हल्ला करणारे तिघे १२ तासांत जेरबंद

पान-सिगारेटच्या उधारीवरून कोयता अन् तलवारीने हल्ला करणारे तिघे १२ तासांत जेरबंद

जळगावच्या गोदावरी कॉलेज परिसरातील घटना ; 

जळगाव, प्रतिनिधी : पान आणि सिगारेट उधारीवर न दिल्याचा राग मनात धरून भंगार व्यावसायिकावर कोयता आणि तलवारीने जीवघेणा हल्ला करण्यात आल्याची धक्कादायक घटना जळगाव शहरातील गोदावरी इंजिनिअरिंग कॉलेजजवळ घडली. शुक्रवारी (दि. २३ ऑक्टोबर) सकाळी आठच्या सुमारास घडलेल्या या घटनेने परिसरात खळबळ उडाली. हल्ला करून पळून गेलेल्या आरोपींचा एमआयडीसी पोलिसांनी वेगाने शोध घेत तीन जणांना १२ तासांच्या आत अटक केली.

किशोर माधवराव बाविस्कर (वय ४१, रा. शिवनगर, खेडी बुद्रुक, जळगाव) हे भंगार व्यवसायासह पानटपरी चालवतात. उधारीवर पान-सिगारेट न दिल्याच्या कारणावरून आनंद हरी पाटील (वय २४), हर्षल रविंद्र शिंदे (वय २०), गौरव विनोद पाटील (वय २०) आणि एका विधिसंघर्षित बालकाने बाविस्कर यांच्याशी वाद घातल्याचा आरोप आहे. वादाचे रूपांतर मारहाणीत झाले. आरोपींनी बाविस्कर यांना लाथाबुक्क्यांनी मारहाण करत जिवे मारण्याची धमकी दिली. त्यानंतर आनंद पाटील याने धारदार कोयत्याने, तर हर्षल शिंदे याने तलवारीने त्यांच्यावर हल्ला केला. ‘तुम्हा दोन्ही भावांना जिवंत सोडणार नाही,’ अशी धमकीही देण्यात आल्याचे फिर्यादीत नमूद आहे.

हल्ल्यात जखमी झालेल्या बाविस्कर यांना जळगावच्या सिव्हिल हॉस्पिटलमध्ये उपचारासाठी दाखल करण्यात आले. त्यांच्या जबाबावरून एमआयडीसी पोलीस ठाण्यात गुन्हा रजिस्टर क्रमांक ८७०/२०२६ नुसार भारतीय न्याय संहिता २०२३ चे कलम १०९(१), ३५१(२), ३५२, ३(५) आणि शस्त्र अधिनियम कलम ४/२५ अन्वये गुन्हा नोंदविण्यात आला.

गोपनीय माहितीच्या आधारे आरोपींचा शोध –गंभीर स्वरूपाच्या या घटनेनंतर पोलीस अधीक्षक श्रीकांत धिवरे यांनी एमआयडीसी पोलिसांच्या गुन्हे शोध पथकाला आरोपींचा तातडीने शोध घेण्याचे निर्देश दिले. वरिष्ठांच्या मार्गदर्शनाखाली पथकाने घटनास्थळाची पाहणी केली आणि गोपनीय माहितीच्या आधारे आरोपींचा माग काढला. त्यानंतर आनंद हरी पाटील, हर्षल रविंद्र शिंदे आणि गौरव विनोद पाटील, तिघेही रा. खेडी, ता. जळगाव, यांना अटक करण्यात आली. गुन्ह्यात एका विधिसंघर्षित बालकाचाही सहभाग असल्याचे पोलिसांनी नमूद केले आहे.

या पथकाने केली कारवाई : पोलीस अधीक्षक श्रीकांत धिवरे, अपर पोलीस अधीक्षक संदीप गावीत, उपविभागीय पोलीस अधिकारी नितीन गणापुरे आणि एमआयडीसी पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक बबन आव्हाड यांच्या मार्गदर्शनाखाली ही कारवाई झाली. पोलीस उपनिरीक्षक विठ्ठल पवार, पोलीस हेडकॉन्स्टेबल रामकृष्ण पाटील, पोलीस नाईक प्रदीप चौधरी, पोलीस हेडकॉन्स्टेबल संजीव मोरे, पोलीस कॉन्स्टेबल नितीन ठाकूर, गणेश ठाकरे, किरण पाटील, राहुल घेटे, शशिकांत मराठे, रमाकांत साळुंखे, सुभाष साबळे आणि राहुल पाटील यांनी कारवाईत सहभाग घेतला.

गुन्ह्याचा पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक विठ्ठल पवार करीत आहेत.

 

Chetan Wani

पत्रकारिता क्षेत्रात गत १६ वर्षांपासून कार्यरत. शोध पत्रकारिता, क्राईम रिपोर्टींगचा १५ वर्षांचा प्रदीर्घ अनुभव. राजकारण, प्रशासन, क्रीडा, संस्कृती, उद्योग जगतातील विशेष लेखन. विविध दैनिक, मंत्रालय, माहिती व जनसंपर्क विभागातील पत्रकारितेचा अनुभव. लोकसभा, विधानसभा, मनपा निवडणूक काळात मीडिया मॅनेजमेंट. सोशल मीडिया मॅनेजमेंट, इमेज बिल्डिंग, मार्केटिंग, ब्रॅण्डिंग यासारख्या विविध क्षेत्राचा प्रदीर्घ अनुभव. संपर्क : 9823333119

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button