मध्यप्रदेशात पोलिसांचे ‘ऑपरेशन कॉम्बिंग’; अवैध शस्त्रनिर्मितीच्या अड्ड्यांवर धडक, १२ संशयित ताब्यात

मध्यप्रदेशात पोलिसांचे ‘ऑपरेशन कॉम्बिंग’; अवैध शस्त्रनिर्मितीच्या अड्ड्यांवर धडक, १२ संशयित ताब्यात
जळगाव, धुळे व नाशिक ग्रामीण पोलिसांची संयुक्त कारवाई; ४५ घरांची झडती, २ देशी कट्टे, ४ काडतुसे, ३२ संशयित दुचाकी आणि शस्त्रनिर्मितीचे साहित्य जप्त
जळगाव | प्रतिनिधी
अवैध शस्त्रनिर्मिती, शस्त्र तस्करी आणि फरार आरोपींच्या शोधासाठी जळगाव, धुळे व नाशिक ग्रामीण पोलिसांनी मध्यप्रदेशातील बडवाणी जिल्ह्यातील पार उमरटी (ता. वरला) येथे राबविलेल्या अंतरराज्यीय ‘ऑपरेशन कॉम्बिंग’ मोहिमेत मोठे यश मिळविले आहे. ४०० हून अधिक अधिकारी-कर्मचाऱ्यांच्या सहभागातून पहाटेच्या सुमारास राबविण्यात आलेल्या या धडक कारवाईत १२ संशयितांना ताब्यात घेण्यात आले असून मोठ्या प्रमाणात अवैध शस्त्रनिर्मितीचे साहित्य जप्त करण्यात आले.
४५ घरांची झडती, २० जणांची चौकशी
२९ जुलै २०२६ रोजी पार पडलेल्या या विशेष मोहिमेत ४५ संशयित घरांवर झडती घेण्यात आली. तसेच २० संशयित व्यक्तींची सखोल चौकशी करण्यात आली. चोपडा ग्रामीण पोलीस ठाण्यातील गुन्ह्याच्या अनुषंगाने दोन देशी कट्टे आणि चार जिवंत काडतुसे जप्त करण्यात आली.
शस्त्रनिर्मितीचे साहित्य आणि दुचाकी जप्त
कारवाईदरम्यान ३२ संशयित महाराष्ट्र पासिंग मोटारसायकली, देशी कट्टे तयार करण्यासाठी वापरला जाणारा कच्चा माल, साचे आणि इतर साहित्य जप्त करण्यात आले. याशिवाय २७ फरार व संशयित आरोपींच्या घरांचे जिओ-टॅगिंग करण्यात आले असून पुढील तपासासाठी ही माहिती महत्त्वाची ठरणार आहे.
वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या नेतृत्वाखाली मोहीम
या मोहिमेचे नेतृत्व अपर पोलीस अधीक्षक अशोक नखाते यांनी केले. त्यांच्यासह जळगाव, धुळे व नाशिक ग्रामीण पोलीस दलातील विविध वरिष्ठ अधिकारी, स्थानिक गुन्हे शाखेची पथके आणि ४०० हून अधिक अधिकारी-कर्मचारी तसेच २० शासकीय वाहनांचा ताफा या कारवाईत सहभागी झाला होता.
संघटित गुन्हेगारीवर मोठा आघात
अंतरराज्यीय समन्वयातून राबविण्यात आलेल्या या कारवाईमुळे अवैध शस्त्रनिर्मिती व तस्करीच्या जाळ्यावर मोठा आघात झाला असून फरार आरोपींचा शोध घेण्यासाठी आणि संघटित गुन्हेगारीवर प्रभावी नियंत्रण मिळविण्यासाठी ही मोहीम महत्त्वपूर्ण ठरल्याचे पोलिसांनी सांगितले.
नागरिकांना पोलिसांचे आवाहन
जिल्ह्यात अवैध शस्त्रास्त्रे, संघटित गुन्हेगारी आणि फरार आरोपींविरुद्ध कठोर कारवाई सातत्याने सुरू राहणार असून संशयास्पद हालचाली किंवा बेकायदेशीर कृत्यांची माहिती नागरिकांनी तात्काळ पोलिसांना द्यावी, असे आवाहन जिल्हा पोलीस अधीक्षक श्रीकांत धिवरे यांनी केले आहे.






