पाळधी साई मंदिरात २४ पासून तीन दिवसीय ‘ब्रह्मोत्सव’चे आयोजन
सुंदरकांड, भजन संध्याचे आयोजन : इंडियन आयडॉल फेम गायक येणार
महा पोलीस न्यूज । दि.२१ डिसेंबर २०२४ । जळगाव शहरापासून जवळच असलेल्या पाळधी येथे श्री साई बाबा मंदिरात दरवर्षी प्रमाणे यंदा देखील ‘ब्रह्मोत्सव’ दि.२४ ते २६ डिसेंबर दरम्यान आयोजित करण्यात आला आहे. तीन दिवसीय ब्रह्मोत्सवाचे यंदा २२ वे वर्ष असून या धार्मिक उत्सवात भाविक मोठ्या संख्येने सहभागी होणार आहेत. श्री साई मंदिराच्या २२ व्या वर्धापन दिनानिमित्त महोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे.
धरणगाव तालुक्यातील पाळधी येथे प्राचीन श्री सच्चिदानंद सद्गुरू साईबाबा, परमभक्त हनुमान आणि स्वयंभू गायल माताजी मंदिर असून त्याचा यंदा २२ वा वर्धापनदिन समारोह साजरा करण्यात येत आहे. समारोहनिमित्त यंदा देखील तीन दिवसीय ‘ब्रह्मोत्सव’चे आयोजन करण्यात आले आहे.
सुंदरकांड, भजन संध्याचे आयोजन
‘ब्रह्मोत्सव’मध्ये मंगळवार दि.२४ रोजी संध्याकाळी ६ वाजता विश्वविख्यात सुंदरकांड गायिका प.पू.सुश्री.अल्काश्रीजी या सुंदरकांड सादर करणार असून यात हनुमानाच्या भक्तीचे वर्णन आहे. हनुमानाची भगवान श्रीरामांप्रति असलेल्या आस्थेचे वर्णन संगीतमय सुंदरकांड द्वारा अल्काश्रीजी या सादर करणार आहे. बुधवार दि.२५ रोजी सायंकाळी ६ वाजेपासून इंडियन आयडॉल फेम गायक नितीन कुमार हे भजन संध्या सादर करणार आहेत.
विविध कार्यक्रम व महाप्रसादाचे आयोजन
गुरूवार दि.२६ रोजी श्री साईबाबा, परमभक्त हनुमान, गायल माताजी यांचा सकाळी ९ ते १२ दरम्यान पवित्र मंत्रोच्चारात महाभिषेक करण्यात येणार असून दुपारी ४ वाजता महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले आहे. भाविकांनी तीनही दिवस मोठ्या प्रमाणात उपस्थिती देऊन भक्तिरसात न्हाऊन निघावे, असे आवाहन देवकीनंदन झंवर, सुनील झंवर, मधुकर झंवर, रामचंद्र झंवर, किरण झंवर, प्रवीण झंवर, सुरज (लाला) झंवर, चंद्रकांत इंदाणी, राजेंद्र इंदाणी, शरदचंद्र कासट, नितीन लढ्ढा, मनीष झंवर, राजेश दोशी, राजेश तोतला, दीपक ठक्कर, विपुल सुरतवाला, शैलेश काबरा, हितेंद्र (पप्पू) चौधरी, नरेश दोशी, सतिष अग्रवाल, कैलास मालू आदींनी केले आहे.
मंदिर, ब्रह्मोत्सव उत्सवाचे उपक्रम
श्री साईबाबा मंदिर आणि ब्रह्मोत्सवतर्फे दरवर्षी विविध सामाजिक उपक्रम राबविले आणि चालविले जातात. त्यात साई मंगल कार्यालय, द्वारकामाई हॉल (साई भक्त निवास), पूरग्रस्तांना धान्य वाटप, पाणी अडवा, पाणी जिरवा अंतर्गत नाले खोदकाम, मुख्यमंत्री सहाय्यता निधीस मोठी आर्थिक मदत, साई जन-औषधी केंद्र, पुणे, दिवाळी दीपोत्सव, दसरा रावण दहन, गोपाल जन्मोत्सव, शालेय विद्यार्थ्यांना वह्या वाटप, ९०० भाकड गाईंची श्री साई गौशाळा, धर्मार्थ दवाखाना यांचा समावेश आहे.