अपना भिडू, बच्चू कडू : पराभवाच्या निकालानंतर बच्चू कडू पुन्हा सेवाकार्यात!
पहाटे तीन वाजता अपघातग्रस्तांच्या भेटीसाठी : नागपूर रवाना घटनेतील जखमींना दिला धीर

महा पोलीस न्यूज । दि.२४ नोव्हेंबर २०२४ । ‘सेवा हाच आमचा धर्म’ हे ब्रीद घेऊन गेल्या पंचवीस वर्षांपासून बच्चू कडू रुग्णसेवेसह, गोरगरीब, वंचित घटकांसाठी काम करत आहेत. शनिवारी विधानसभा निवडणुकीचा निकाल लागला आणि या निकालात बच्चू कडू यांचा पराभव झाला मात्र पराभवाची चिंता न करता बच्चू कडू यांनी हसतमुखाने आपल्या सेवाकार्याला प्राधान्य देत काल रात्री अपघातात जखमी झालेल्या रुग्णांना भेटण्यासाठी नागपूर येथील रुग्णालयात जाऊन जखमींची विचारपूस केली व त्यांना धीर दिला.
राजकारणात जय पराजय चालतोच, मात्र शनिवारी लागलेल्या निकालाने सर्वांनाच धक्का बसला. राज्यातील असंख्य दिव्यांग, कामगार, शेतकरी, शेतमजुरांचा एकमेव हक्काचा आवाज असलेले बच्चू कडू यांना सुद्धा या पराभवाचा सामना करावा लागला. चार वेळा या मतदारसंघाचे प्रतिनिधित्व करणारे बच्चू कडू यांचा पराभव झाल्यानंतर संपूर्ण राज्यातील कार्यकर्ते व चाहते नाराज झाले. खुद्द बच्चू कडू यांना सुद्धा हा पराभव अविश्वसनीय होता मात्र आपल्या पराभवाने खचून न जाता त्यांनी सर्वांना पुन्हा उठून उभे राहण्याचा व सेवा करण्याचा सल्ला दिला.
दरम्यान चांदूर बाजारयेथील मित्रपरिवाराच्या नागपूरला एका लग्नसोहळ्याला उपस्थित राहण्याकरिता जात असताना काल मध्यरात्री एक वाजताच्या दरम्यान त्यांच्या चारचाकी वाहनाला कोंढाळी नजीक अपघात झाल्याची बातमी बच्चू कडू यांना माहिती पडताच त्यांनी रात्री साडे तीन वाजता आपल्या वाहनाने कोंढाली गाठले. या घटनेत सोपान नितीन कोरडे व ऋषिकेश गावंडे यांचा जागीच मृत्यू झाला होता तर अजिंक्य बाळासाहेब वाकोडे, ऋषिकेश खोंड हे दोघे जखमी झाले होते. बच्चू कडू यांनी आधी कोंढाली येथील रुग्णालयात जाऊन डॉक्टरांची भेट घेतली घटनेबाबत माहिती घेतली त्यानंतर लगेच नागपूर येथील खासगी रुग्णालय गाठून दोन्ही जखमींची आस्थेने विचारपूस करून त्यांना व त्यांच्या कुटुंबियांना धीर दिला. तसेच डॉक्टरांना भेटून विशेष लक्ष देण्याची विनंती केली.
निवडणुकीचा निकाल लागल्यानंतर सुद्धा शांततेची झोप न घेता बच्चू कडू यांनी आपल्या सेवेला प्रथम प्राधान्य देऊन रुग्णसेवेला दिलेले महत्व यामुळे बच्चू कडू यांच्या प्रति जनसामान्यांमध्ये आणखी आदरभाव वाढला. जनतेने जो निकाल दिला तो स्वीकारून आपले जे सेवेचे कार्य आहे ते अविरत सुरू ठेवण्यासाठी बच्चू कडू हे पुन्हा नव्याने सज्ज झाले आहेत.