
अनुसूचित जाती उपवर्गीकरणाविरोधात अमळनेरमध्ये वज्रमूठ; तालुक्यात भव्य मोर्चा काढण्याचा निर्धार
अमळनेर (प्रतिनिधी) अनुसूचित जाती संवर्गाच्या उपवर्गीकरणाला विरोध दर्शवण्यासाठी शहरातील साने गुरुजी विद्यालयात १९ ऑगस्ट रोजी सायंकाळी ५ वाजता अनुसूचित जाती संवर्गातील विविध समाज घटकांची सहविचार सभा खेळीमेळीच्या वातावरणात पार पडली. या बैठकीत उपवर्गीकरणाविरोधात एकजुटीने लढा उभारण्याचा आणि तालुक्यात भव्य मोर्चा काढण्याचा ठराव एकमुखाने मंजूर करण्यात आला.
येत्या पुढील महिन्यात जिल्हास्तरावर उपवर्गीकरण विरोधी मोर्चाचे आयोजन करण्यात आले आहे. त्या पार्श्वभूमीवर, पूर्वतयारी म्हणून अमळनेर तालुक्यात सर्वप्रथम उपवर्गीकरण विरोधी मोर्चा काढण्याचे बैठकीत ठरवण्यात आले. चर्मकार महासंघाचे ज्येष्ठ नेते भानुदास विसावे यांनी मार्गदर्शन करताना सांगितले की, “भविष्यात येणाऱ्या असंवैधानिक संकटाला परतवून लावण्यासाठी सर्व समाज घटकांनी एकत्र येऊन वज्रमूठ आवळण्याची गरज आहे.”
या सहविचार सभेला बौद्ध, चांभार, होलार, मातंग व मेहतर समाजाचे प्रतिनिधी मोठ्या संख्येने उपस्थित होते. सर्व समाज बांधवांनी या लढ्यात खांद्याला खांदा लावून सहभागी होण्याची आणि मोर्चा यशस्वी करण्याची शपथ घेतली. उपवर्गीकरण विरोधी कृती समितीच्या वतीने तालुक्यातील सर्व अनुसूचित जाती घटकांना या मोर्चात मोठ्या संख्येने सामील होण्याचे आवाहन करण्यात आले आहे.
याप्रसंगी चर्मकार महासंघाचे भानुदास विसावे, नरेश कांबळे, विजय बिऱ्हाडे, आरपीआयचे यशवंत बैसाने, ॲड. प्रशांत संदानशिव, सनी गायकवाड,अरुण मोरे,सोमचंद संदानशिव, हृदयनाथ मोरे, अतुल डोळस, बापूराव संदानशिव, योगराज संदानशिव, अर्जुन संदानशिव, अरुण घोलप, गौतम मोरे, अशोक बिऱ्हाडे, सुभाष आगळे, भगवान संदानशिव, अनिकेत ब्रम्हे,अशोक सैंदाने, दगडू सोनवणे,राहुल वाडेकर, मच्छिंद्र साळुंखे, राजेंद्र सैंदाने, गौतम शिरसाठ , उत्तर वानखेडे यांच्यासह ग्रामीण भागातील अनेक कार्यकर्ते व समाज बांधव उपस्थित होते.







