Social

भडगावातील गिरणा पुलाची दुरवस्था गंभीर; खड्डे, साचलेले पाणी आणि तुटलेले कठडे ठरताहेत अपघातांना निमंत्रण

भडगावातील गिरणा पुलाची दुरवस्था गंभीर; खड्डे, साचलेले पाणी आणि तुटलेले कठडे ठरताहेत अपघातांना निमंत्रण

भडगाव (प्रतिनिधी ) शहरातील पेठ भागाला जोडणाऱ्या गिरणा नदीवरील पुलाची अवस्था दिवसेंदिवस अधिकच बिकट होत असून, पुलावरील वाढते खड्डे, साचलेले पावसाचे पाणी आणि तुटलेले सुरक्षा कठडे यामुळे वाहनधारक व पादचाऱ्यांना मोठा त्रास सहन करावा लागत आहे. सार्वजनिक बांधकाम विभागाच्या दुर्लक्षामुळे नागरिकांमध्ये तीव्र नाराजी व्यक्त होत असून, पुलाची तातडीने कायमस्वरूपी दुरुस्ती करण्याची मागणी जोर धरत आहे.

सध्या पुलावर लहान-मोठ्या असंख्य खड्ड्यांमध्ये पावसाचे पाणी साचल्याने पुलाला अक्षरशः तलावाचे स्वरूप आले आहे. त्यामुळे वाहनचालकांना खड्ड्यांचा अंदाज येत नसल्याने जीव धोक्यात घालून प्रवास करावा लागत आहे. विशेषतः दुचाकीस्वारांना खड्डे चुकवताना अपघाताचा मोठा धोका निर्माण झाला आहे. पुलाच्या दोन्ही बाजूंना मोठ्या प्रमाणात माती साचल्याने पावसाच्या पाण्याचा निचरा होत नाही. परिणामी, वाहने वेगाने जात असताना खड्ड्यातील चिखलमिश्रित पाणी थेट पादचाऱ्यांच्या अंगावर उडत असून, नागरिकांना रोजच गैरसोयीचा सामना करावा लागत आहे. याशिवाय पुलावरील काही सुरक्षा कठडे तुटलेल्या अवस्थेत असल्याने रात्रीच्या वेळी आणि पावसात प्रवास अधिक धोकादायक ठरत आहे. नागरिकांच्या मते, या पुलावर कोणत्याही क्षणी गंभीर अपघात होण्याची शक्यता नाकारता येत नाही.

यापूर्वी सार्वजनिक बांधकाम विभागाकडून खड्ड्यांमध्ये खडी व माती टाकून तात्पुरती डागडुजी करण्यात आली होती. मात्र, पहिल्याच पावसात ती वाहून गेल्याने पुन्हा पूर्वस्थिती निर्माण झाली आहे. त्यामुळे अशा तात्पुरत्या उपाययोजनांऐवजी पुलाची कायमस्वरूपी व दर्जेदार दुरुस्ती करण्याची मागणी नागरिकांकडून होत आहे. दरम्यान, सार्वजनिक बांधकाम विभागाच्या संथ कारभारावर नागरिकांनी सोशल मीडियावरून तीव्र नाराजी व्यक्त केली आहे. तालुक्यातील नागरिक, व्यापारी आणि वाहनधारकांनी सर्वपक्षीय लोकप्रतिनिधींनी या प्रश्नात लक्ष घालून प्रशासनावर दबाव आणावा, अशी मागणी केली आहे.

पावसाळ्याचा कालावधी अजून शिल्लक असल्याने, भविष्यात मोठी दुर्घटना घडण्यापूर्वी प्रशासनाने तातडीने पुलाची कायमस्वरूपी दुरुस्ती करून नागरिकांना सुरक्षित प्रवासाची सुविधा उपलब्ध करून द्यावी, अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे.

Chetan Wani

पत्रकारिता क्षेत्रात गत १६ वर्षांपासून कार्यरत. शोध पत्रकारिता, क्राईम रिपोर्टींगचा १५ वर्षांचा प्रदीर्घ अनुभव. राजकारण, प्रशासन, क्रीडा, संस्कृती, उद्योग जगतातील विशेष लेखन. विविध दैनिक, मंत्रालय, माहिती व जनसंपर्क विभागातील पत्रकारितेचा अनुभव. लोकसभा, विधानसभा, मनपा निवडणूक काळात मीडिया मॅनेजमेंट. सोशल मीडिया मॅनेजमेंट, इमेज बिल्डिंग, मार्केटिंग, ब्रॅण्डिंग यासारख्या विविध क्षेत्राचा प्रदीर्घ अनुभव. संपर्क : 9823333119

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button